सिंध प्रांतात लश्कर-ए-तैयबा संघटनेचा वरिष्ठ कमांडर आणि नागपूर RSS हल्ल्याचा मुख्य साजिशकर्ता रजाउल्ला निजामनी उर्फ अबू सैफुल्ला खालिद अज्ञात बंदूकधारकांनी ठार केला. हा हल्ला पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या अंतर्गत संघर्षाची चिन्हे दर्शवतो.
नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयावर 2006 मध्ये झालेला भीषण दहशतवादी हल्ला अजूनही अनेकांच्या स्मरणात ताजा आहे. भारतातील या हाय-सिक्युरिटी परिसरावर झालेल्या त्या आत्मघाती हल्ल्याने देशभर खळबळ उडवली होती. या हल्ल्याचा मास्टरमाइंड रजाउल्लाह निजामनी उर्फ अबू सैफुल्ला खालिद याला अखेर पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात बंदूकधार्यांनी गोळ्या घालून ठार केले आहे.
सैफुल्ला हा लश्कर-ए-तैयबा या कुख्यात दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ कमांडर होता. 2006 मधील नागपूर हल्ल्याचा मुख्य सूत्रधार. त्या दिवशी, लष्करी पोशाखात असलेल्या तीन दहशतवाद्यांनी नागपूरच्या RSS मुख्यालयावर घुसण्याचा प्रयत्न केला होता. सुरक्षा दलांनी वेळेत प्रत्युत्तर देत त्यांना ठार केले, परंतु या घटनेमुळे RSS आणि नागपूर शहर थरारून गेले होते. तपासात पुढे आले की हा हल्ला पाकिस्तानातून उगम पावलेला कट होता. त्यामागे सैफुल्ला यासारख्या मोठ्या मास्टरमाइंड्सचा हात होता.
नेपाळ मॉड्युल
18 मे रविवारी सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लावर ताबडतोब गोळ्यांचा मारा केला आणि त्याला जागीच ठार केले. सैफुल्ला पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबा संघटनेच्या नेपाळ मॉड्युलचा प्रमुख होता. तेथे बसून भारतात हल्ले घडवण्यासाठी नव्या दहशतवाद्यांची भरती करत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जनाज्याची नमाज मोठ्या पोलीस बंदोबस्तात पार पडली. त्याच्या पार्थिवावर पाकिस्तानचा झेंडा आच्छादित करण्यात आला आणि अनेक लष्कर दहशतवाद्यांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानातील लष्करच्या टॉप दहशतवाद्यांची सुरक्षा ISI आणि पाकिस्तानी लष्कराने वाढवली होती. या ऑपरेशनमध्ये लष्करच्या मुख्यालयाला लक्ष्य करून मोठा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सैफुल्लाला घराबाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु तरीही त्याच्यावर हल्ला होणे हे पाकिस्तानातील अंतर्गत दहशतवादी संघर्षाचे स्पष्ट लक्षण मानले जात आहे.
घातक कट
सैफुल्ल्याच्या आधीही लष्करच्या अनेक वरिष्ठ कमांडर्सवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. मार्च 2025 मध्ये अबू कताल नावाचा टॉप कमांडर पाकिस्तानात ठार झाला, जो काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षादलांवर अनेक हल्ल्यांचा मास्टरमाइंड होता. डिसेंबर 2023 मध्ये कराचीमध्ये हंजला अदनान नावाचा आणखी एक वरिष्ठ कमांडर मारला गेला, तर सप्टेंबर 2023 मध्ये अबू कासिम उर्फ रियाज अहमद याची हत्या झाली होती. हे सर्व हल्ले लष्करप्रमुख हाफिज सईदसाठी मोठा झटका मानले जात आहेत. लाहोरमध्ये स्वतः सईदवरही फिदायीन हल्ला झाला होता. ज्यातून तो कसाबसा बचावला होता.
सैफुल्ला खालिदच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हे स्पष्ट होते आहे की, पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांमध्ये अंतर्गत फुट पडली आहे की भारताच्या सर्जिकल ऑपरेशन्समुळे त्यांच्या मुळावर घाव बसतोय? ज्या व्यक्तीने भारतातील शांततेला तडा देण्याचा प्रयत्न केला होता, त्याचा शेवट स्वतःच्या देशात अशा हिंसक पद्धतीने होणे हेच सांगते. हिंसेचा मार्ग निवडणाऱ्यांचा शेवट कायम असाच भयावह असतो.