महाराष्ट्र

Nagpur : बच्चू कडूंच्या प्रहारने उद्रेक, स्वर्गरथच पेटवला

Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उसळला ज्वाला

Author

दिव्यांग, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी प्रहार संघटनेनं महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन छेडलं. मात्र नागपूरात आंदोलनाचं रूप इतकं आक्रमक झालं की, एका स्वर्गरथालाच पेटवून देण्यात आलं.

राज्याच्या रस्त्यांवर 24 जुलै गुरुवारी सकाळी प्रहार संघटनेच्या संतप्त रणशिंगाने खळबळ उडवली. बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांच्या न्यायहक्कांसह विविध मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात नागपूरमध्ये परिस्थिती इतकी उग्र झाली की, एका स्वर्गरथालाच आंदोलनाच्या आगीत जाळून टाकण्यात आलं. ही घटना इतकी भावनिक आणि संवेदनशील आहे की, तिने केवळ नागपूर नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या मनाचा ठाव घेतला आहे.

गोंडखैरी येथील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर 24 जुलै रोजी सकाळपासूनच प्रहारचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. वाहनांची वाहतूक रोखून त्यांनी जोरदार निदर्शने सुरू केली. मात्र आंदोलनाचा रोष इतका वाढला की अचानकपणे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या स्वर्गरथाला थांबवले आणि त्याला पेटवून दिलं. पाहता पाहता त्या वाहनाचे केबिन पूर्णतः जळून खाक झाले. या संतापाच्या आगीत श्रद्धा आणि माणुसकीचा होरपळ झाल्याची भावना जनतेत उमटत आहे.

Bacchu Kadu : सभागृहात रमीचा खेळ, नागपूरच्या रस्त्यांवर प्रहारचा उद्रेक

यंत्रणेच्या सज्जतेवरही प्रश्नचिन्ह

पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत आग आटोक्यात आणली, अन्यथा पुढील अनर्थ ओढवला असता. याआधीच काही आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली होती. तरीदेखील प्रहार कार्यकर्त्यांनी सकाळी उग्रपणे आंदोलन सुरू ठेवलं. यामुळे पोलिस यंत्रणेच्या सज्जतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. संबंधित प्रहार कार्यकर्त्यांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आंदोलनाच्या नावाखाली घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरकरांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून सोशल मीडियावर याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

निवडलेला मार्ग हिंसक

प्रहार संघटनेच्या मागण्या नक्कीच गंभीर आणि समाजोपयोगी आहेत. दिव्यांगांसाठी हक्क, शेतकऱ्यांची कर्जमाफी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची स्थिती, पण या मागण्यांसाठी निवडलेला मार्ग हिंसक, असंवेदनशील आणि सामाजिक धोक्याचा बनतोय का, याचा विचार करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्वर्गरथ सारख्या सेवेला लक्ष्य केल्याने आंदोलनकर्त्यांच्या संवेदनशीलतेवरच प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेला प्रश्न आहेत, पण त्यांचं उत्तर जर अशा आगजनीतून मिळणार असेल, तर लोकशाही मार्गाचं काय होणार?

Chandrapur : घरकुल स्वप्नांवर वाहतूक खर्चाचे सावट

न्यायाचा आवाज

प्रशासनाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी या घटनेने आंदोलनाच्या मर्यादांवर गंभीर चर्चा सुरू केली आहे. प्रहार संघटनेनं मांडलेले मुद्दे अंमलात यावेतच, पण अशा घटकांच्या भावनांवर प्रहार न होता, शासनाच्या निर्णयांवर प्रहार व्हावा, हीच लोकांची अपेक्षा आहे. एकंदरित, प्रहारचा आवाज न्यायासाठी होता, पण तो जर आगीच्या ज्वाळांमध्ये हरवू लागला, तर आंदोलनाचा हेतू हरवतो आणि उरतो तो फक्त राख आणि पश्चाताप. लोकशाहीमध्ये संतप्त आवाज महत्वाचा, पण तो जर असंवेदनशीलतेचा टोक गाठत असेल, तर तो समाजाच्या अंत:करणाला जखमा देतो. आंदोलन असो, पण माणुसकीच्या मर्यादा पार करू नयेत, हेच या घटनेतून शिकण्यासारखं आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!