
राज्य शासनाने नवीन प्रशासकीय बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत. या बदल्यांमुळे विदर्भातील काही महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.
राज्य प्रशासनात 22 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी जाहीर करण्यात आलेल्या बदली आदेशांनुसार विदर्भातील अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नवे अधिकारी रुजू होणार आहेत. या आदेशामुळे चंद्रपूर, बीड व नागपूरसह पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या विकास महामंडळांमध्ये देखील नव्या नेतृत्वाची नियुक्ती झाली आहे. या बदलांचा थेट परिणाम जिल्हास्तरावरील योजनांच्या अंमलबजावणीवर होणार असल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळातही उत्सुकता निर्माण झाली आहे.
विशेषतः चंद्रपूर जिल्ह्याला नव्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची भेट झाली आहे. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्य सचिव पदावरून पश्चिम महाराष्ट्रात बदल करण्यात आलेला आहे. यामुळे विदर्भातील योजनांचा गतीमान आणि काटेकोर अंमलबजावणीचा वेग काहीसा मंदावण्याची शक्यता आहे. तरीही नवीन अधिकार्यांकडून ताज्या दृष्टीकोनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा परिषदेची जबाबदारी
पुलकित सिंह हे याआधी अंबड (जालना) उपविभागाचे सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कार्यशैलीला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेतली. त्यांची नियुक्ती आता चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी आणि खाणपट्ट्यांतील विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा अनुभव महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
पूर्वी या पदावर कार्यरत असलेले विवेक जॉन्सन यांची बदली बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे. त्यांचा चंद्रपूरमध्ये झालेला अनुभव आणि प्रशासनातील गतिमान कार्यपद्धती बीडसारख्या ग्रामीण जिल्ह्यातील योजनांना नवा गतीमान मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
Vijay Wadettiwar : काँग्रेस म्हणते पहिलं त्यांचं काय ते ठरू द्या
विदर्भ वैधानिक विकास
शुभम गुप्ता हे नागपूरमधील विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत होते. त्यांच्या ठिकाणी त्यांनी अनेक योजनांना धोरणात्मक दिशा दिली होती. आता त्यांची बदली पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी पुण्याकडे करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सध्या नवीन नियुक्ती जाहीर झालेली नाही.
बदली आदेशाद्वारे अभिषेक कृष्ण यांची नगर प्रशासन संचालनालय, मुंबईचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. तसेच, बीड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची बदली मत्स्य व्यवसाय विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. या सर्व बदलांमुळे विदर्भातील प्रशासकीय रचना नव्या पद्धतीने आकार घेणार आहे. नव्या अधिकाऱ्यांकडून कार्यक्षमता, पारदर्शकता आणि गतिशील निर्णयप्रक्रियेची अपेक्षा आहे. येत्या काळात या बदलांचा स्थानिक विकासावर ठसा उमटणार हे निश्चित आहे.