
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत सुरू असलेले उपोषण आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन स्थगित केले.
मनोज जरांगे पाटील यांनी अखेर अंतरवाली सराटीत सुरू असलेले उपोषण स्थगित केले आहे. सरकारच्या प्रतिनिधी आमदार सुरेश धस यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले. मात्र, उपोषण स्थगित करतानाच जरांगेंनी सरकारला इशारा देत म्हटले की, मराठा समाजाच्या मागण्या लवकर पूर्ण झाल्या नाहीत तर आता थेट राजधानी मुंबईत आंदोलन उभारले जाईल.
सरकारकडून ठोस निर्णय घेतला गेला नाही तर संपूर्ण राज्यात मराठा समाजासाठी आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यांनी भाषणातून शिंदे समितीच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली. शिंदे समितीला मंत्रालयावर कुलूप लावण्यात आले होते, ते आता पुन्हा कार्यरत झाले आहे, यासाठी हा लढा होता, असे त्यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीला धक्का; Pen Drive Bomb प्रकरणात चौकशीचा आदेश
कारवाईची मागणी
बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जातीय प्रवृत्तीचे अधिकारी मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. जरांगेंनी या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केलेली आहे. आता हे अधिकारी राज्यात नको, असे ते म्हणाले. जरांगे यांनी पुढील आंदोलनासाठी आक्रमक भूमिका घेत मंत्र्यांना थेट इशारा दिला. पोलिसांना हात लावायचा नाही, पण मंत्र्यांच्या पोरांना धरायचं अन् हाणायचं, असे ते म्हणाले. आता हे विधानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण करू शकतात.
न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची कार्यवाही सुरू आहे. हैदराबाद गॅझेटियर तपासून समितीकडून अहवाल घेऊन उचित कारवाई केली जाईल. असे आश्वासन देण्यात आले आहे. मुख्यमंत्री दिल्लीत प्रचारात असले तरी त्यांनी सर्व प्रस्ताव मागवून त्यांना मान्यता दिली आहे. मराठा आंदोलनातील गंभीर स्वरूपाच्या केसेस वगळता इतर प्रकरणे मागे घेण्याबाबत शासनाने सकारात्मकता दर्शवली आहे.
आंदोलनाचा इशारा
जरांगे यांनी पुढील आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत. मुंबईतील मोर्चा हा राज्य सरकारला हादरा देईल. यावेळी कोणतेही तडजोडी न करता समोरासमोर लढायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगेंच्या या घोषणेने मराठा आरक्षण लढ्याला नवी दिशा मिळाली आहे. आगामी काळात हे आंदोलन मुंबईत किती तीव्र रूप धारण करेल याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.