नागपंचमीनंतरही आयत्या बिळावर डोलणाऱ्या नागोबांना आमदार अमोल मिटकरी यांनी सडेतोड शब्दांत चपराक दिली. शास्त्रीनगरातील विकासकामांच्या लोकार्पणात त्यांनी हवाबाजांच्या भूलथापांचा पर्दाफाश केला.
अकोल्यातील शास्त्रीनगर येथील विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘क्रेडिटखोरां’वर जोरदार हल्ला चढवला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून त्यांनी ठासून सांगितले की, विकासकामं आमच्याच निधीतून केली जातात. परंतु कोणत्याही अलत्या भलत्या व्यक्तीला निधी दिला जात नाही. माझ्या नावाचे बॅनर असतात, पण उद्घाटनाला मीच नसतो. नागपंचमी झाली तरीही आयत्या बिळावरच्या नागोबांचे डोलणे थांबत नाही, अशा तीव्र शब्दात मिटकरी यांनी भूलथापा मारणाऱ्या नेत्यांना फटकारले.
मिटकरी यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत काही स्थानिक नेत्यांवर नाव न घेता चिमटे काढले. ते म्हणाले, माझ्या अनुपस्थितीत उद्घाटनाचा झपाटा लावला गेला. अरे… तुझी लायकी काय? तू आत्ताच राजकारणात आलास आणि आता स्वतःचं हुकूमी स्थान सांगतोस मिटकरी यांनी पुढे स्पष्ट केलं की, अनेक वेळा कामं सुरु झाली की काही लोक गल्लीत, शेजाऱ्यांत, समाजात भूलथापा मारतात आणि म्हणतात, ‘नाही नाही आम्ही निधी आणला. मात्र नाव वापरतात अमोल मिटकरी यांचंच. तुम्ही निधी कसा आणाल? कुठून आणाल? तुम्ही काय आहात ते आम्हाला माहिती आहे. तुमच्याकडून निधी येतो का? असा खवळलेला सवाल करत मिटकरी यांनी ‘फसव्या हवाबाजां’ना टोले लगावले.
Chandrashekhar Bawankule : 2029 पर्यंत महाराष्ट्र महसूल विभाग ठरेल अग्रेसर
हवाबाजांना ओळखा
या पार्श्वभूमीवर बोलताना मिटकरी यांनी जनतेला सावध करत म्हटले, आता महापालिकेच्या निवडणूक येत आहे. नागपंचमी झाली खरी, पण आता हे आयत्या बिळावरचे नागोबा डोलायला लागले आहेत. हे लोक कोण आहेत, कुठून आलेत, ते जनतेने ओळखलं पाहिजे. याच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील काही घुसखोर आहेत जे जनता गोंधळवून स्वतःचं भूलथापा मारत आहेत.
विकास कामांसाठी निधी कोठून आला यावर मिटकरी यांनी सुस्पष्टता आणली. त्यांनी स्पष्ट केलं की, शास्त्रीनगर येथील या विकास कामासाठी निधी भाजप नेते आशिष पवित्रकार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मिळाला. त्यांचं नाव मी अभिमानाने घेतो. पण कोणत्या अएऱ्या गैऱ्याका, नत्थु खैऱ्याला मी निधी दिला नाही. याबाबत कोणतीही चुकीची समजूत होऊ देऊ नका.
Devendra Fadnavis : सहासूत्री मंत्रातून प्रशासनाच्या सुधारणांचा रोडमॅप तयार
जनतेमध्ये संभ्रम निर्माण करतात
आमदार मिटकरी यांनी म्हटले की, येथे मी पक्ष पाहिला नाही, तर महायुतीचा धर्म पाळला आहे, असंही मिटकरी ठामपणे म्हणाले. त्यांनी हे देखील नमूद केलं की, त्यांच्या पक्षातीलच काही लोक आता जनतेमध्ये जाऊन म्हणतात की ‘आमच्यामुळे निधी मिळाला’, परंतु मी साफ सांगतो, हा निधी आशिष पवित्रकार यांच्या पाठपुराव्यामुळेच मिळाला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, मिटकरी यांनी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, “निवडणूक जवळ आली की अनेकांचे मुखवटे बदलतात. काहीजण भूलथापा देतात, पोस्टरबाजी करतात आणि जनतेला गोंधळात टाकतात. त्यांची बुद्धी वैचारिक रित्या भ्रष्ट झाली आहे. त्यामुळे अशा लोकांच्या नादी लागू नका.
या संपूर्ण भाषणातून अमोल मिटकरी यांनी केवळ राजकीय टीका केली नाही, तर ‘श्रेयासाठी उठसूट उडी मारणाऱ्या’ हवाबाजांनाही सार्वजनिकपणे चपराक दिली. ‘विकास काम करणं आणि त्याचं श्रेय लाटणं’ यातील सीमारेषा त्यांनी ठळकपणे जनतेसमोर मांडली आणि पुढील निवडणुकांपूर्वी जनतेला सजग राहण्याचं आवाहनही केलं.