पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांना आधार देण्यासाठी आकड्यांचा आधार नको, तर न्यायाची गरज आहे, अशी अभिजीत वांजारी यांची विधानपरिषदेत सरकारवर खरमरीत टीका करत मागणी केली.
नागपूरसाठी 23 सप्टेंबरचा दिवस भयानक ठरला. आभाळ फाटल्यागत कोसळलेल्या पावसाने शहरात पूरसदृश्य स्थिती निर्माण केली. अनेक घरांत पाणी घुसले, संरक्षक भिंती कोसळल्या आणि सामान्य नागपूरकरांचे जनजीवन विस्कळीत झाले. अशा परिस्थितीत राज्य सरकारने जाहीर केलेल्या केवळ 204 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजवर विधान परिषदेचे सदस्य काँग्रेस नेते अभिजीत वांजारी यांनी जोरदार आक्षेप घेतला.
विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात नियम 93 अंतर्गत चर्चेची मागणी करताना वांजारी यांनी सरकारच्या या निर्णयावर कठोर शब्दांत टीका केली. त्यांनी विधानभवनात उभं राहत स्पष्ट केलं की, 204 कोटींचं पॅकेज म्हणजे या नैसर्गिक आपत्तीच्या तडाख्यात सापडलेल्या नागपूरकरांवर अन्याय करण्यासारखं आहे.
पावसाने शहर बुडालं
वांजारी म्हणाले, 23 सप्टेंबरला नागपूरमध्ये तब्बल 145 मिमी पावसाची नोंद झाली. इतक्या प्रचंड पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरलं, मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं, तर अनेक भागांतील नागरी सुरक्षाभिंती कोसळल्या. लोकांचे संसार उध्वस्त झाले. ही फक्त एक आकडेवारी नव्हे, ही माणसांच्या वेदनेची, त्रासाची आणि नुकसानाची प्रत्यक्ष साक्ष आहे.
वांजारी यांनी सरकारच्या निर्णयावर टीका करताना स्पष्ट शब्दांत सांगितलं की, सरकारने जाहीर केलेलं 204 कोटींचं पॅकेज म्हणजे फक्त नावापुरती मलमपट्टी आहे. हे नुकसान पाहता, ही मदत अत्यंत तोकडी आणि अपुरी आहे. नागपूरकरांना योग्य न्याय मिळावा, यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, हे संकट फक्त आर्थिक नाही, तर सामाजिक आणि मानवी आहे. मदत ही अशी असावी की, नागरिक पुन्हा नव्याने उभे राहू शकतील. ज्या प्रमाणात नुकसान झालं आहे, त्याप्रमाणात मदत तातडीने वाढवली पाहिजे.
Devendra Fadnavis : विकासाचं रॉकेट, सुरक्षेची ढाल; नव्या अध्यायाकडे महाराष्ट्राची वाटचाल
अध्यक्षांनी घेतली दखल
वांजारींच्या सशक्त मांडणीची दखल घेत विधानपरिषदेचे अध्यक्षांनी आश्वासन दिलं की, या मुद्द्याची माहिती संबंधित शासनस्तरावर नेण्यात येईल आणि पुढील कारवाईसाठी पाठपुरावा केला जाईल. विधान परिषदेत अभिजीत वांजारी यांनी केवळ आकडे दाखवले नाहीत, तर पुरामुळे ग्रस्त झालेल्या नागपूरकरांची वेदना आणि हतबलतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला. या नैसर्गिक संकटानंतर नागपूरच्या पुनर्वसनासाठी तात्काळ आणि प्रभावी मदत ही काळाची गरज आहे, असं त्यांनी ठासून सांगितलं.
तुफानाने घरं नेली, सरकारने आकडे; पण नागपूरच्या लोकांना हवंय खंबीर आधार. हे विधान वांजारी यांच्या भूमिकेचं सार आहे. आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, राज्य सरकार नागपूरच्या दुःखावर फक्त शब्दांची मलमपट्टी करते की खरंच ठोस उपाययोजना राबवते.