
राज्यपाल पोलीस कर्मचाऱ्यांची प्रमाणात पदोन्नती झाली आहे. हवालदारांना पोलिस उपनिरीक्षकपदी तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदी बढती मिळाली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील पोलिस दलातील वाढत्या रिक्त पदांमुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या जबाबदारीचा ताण अधिकाऱ्यांवर वाढला होता. गुन्ह्यांच्या तपासासाठी आवश्यक मनुष्यबळाची कमतरता जाणवत असल्याने पोलिसांमध्ये नाराजी होती. अखेर पोलिस महासंचालक कार्यालयाने मोठा निर्णय घेत राज्यभरातील 496 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक (PSI) आणि 42 सहायक पोलिस निरीक्षकांना (API) पोलिस निरीक्षक (PI) पदावर बढती दिली.
राज्याच्या पोलिस दलातील ही पदोन्नती अनेक महिन्यांपासून प्रलंबित होती. अखेर राज्य शासन आणि पोलिस महासंचालक कार्यालयाने या मुद्द्यावर लक्ष घातले आणि पदोन्नतीच्या निर्णयाला मूर्त स्वरूप दिले. या बहुप्रतीक्षित पदोन्नतीमुळे राज्यभरातील पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा होणार सफाया; Government कठोर भूमिकेत
रिक्त पदांचा भार अधिकाऱ्यांवर
राज्यातील पोलीस दलात उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक पदांच्या शेकडो जागा रिक्त होत्या, त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदारीचा अतिरिक्त ताण अधिकाऱ्यांवर येत होता. एका अधिकाऱ्यावर सरासरी 5 ते 10 गुन्ह्यांचा तपास देण्यात येत असल्यामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होत होता. परिणामी अधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला होता.
गृहमंत्रालय आणि महासंचालक कार्यालय यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पदोन्नती प्रक्रिया लांबणीवर पडत होती. अखेर 2013 अर्हता परीक्षा उत्तीर्ण 496 पोलिस हवालदारांना पोलिस उपनिरीक्षक तर 42 सहायक निरीक्षकांना पोलिस निरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला.
उत्साहाचे वातावरण
मागील सहा महिन्यांपूर्वीच पोलिस उपनिरीक्षक पदाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे नवनियुक्त अधिकाऱ्यांनी आधीच वर्दी, कॅप, बूट आणि इतर साहित्य खरेदी करून ठेवले होते. मात्र, पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
आता महासंचालक कार्यालयाने सकारात्मक निर्णय घेत पदोन्नती यादी जाहीर केल्यामुळे पोलिसांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पदोन्नतीसाठी पोलिस कर्मचारी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. अखेर या बढतीमुळे पोलिसांमध्ये नवीन जोम निर्माण झाला आहे.
पोलीस निरीक्षक पदोन्नतीसाठी अद्याप प्रतीक्षा
राज्यातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना सहायक पोलिस आयुक्त (ACP) किंवा पोलिस उपधीक्षक (DySP) पदावर पदोन्नती देण्याची प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. अनेक पोलिस निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत असतानाही त्यांना बढतीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.
सहायक पोलिस आयुक्त पदाच्या अनेक जागा रिक्त असूनही, पदोन्नती प्रक्रिया रखडल्याने असंतोष वाढत आहे. पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, “खालील पदांच्या पदोन्नती जाहीर केल्या, तशाच प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पदोन्नती लवकरात लवकर जाहीर व्हाव्यात.”
कार्यक्षमतेत सुधारणा अपेक्षित
या पदोन्नतीमुळे पोलीस दलाला मोठा दिलासा मिळाला असला तरी, वरिष्ठ पदांच्या रिक्त जागा भरल्याशिवाय संपूर्ण यंत्रणा सुरळीत होणार नाही. आगामी काळात या पदोन्नतींची प्रक्रिया वेगाने व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ही मोठी पदोन्नती म्हणजे राज्य पोलीस दलासाठी एक सकारात्मक पाऊल असून, पुढील टप्प्यातील बढत्या लवकर जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.