
उपराजधानीच्या विकासासाठी नागपूर महापालिकेच्या पुढाकाराने नाग नदी आणि पोहरा नदीची पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर सफाई सुरू आहे.
नागपूर महानगरपालिका पावसाळ्यापूर्वी शहरातील नाग, पिवळी आणि पोहरा या तीन नद्यांचे स्वच्छता अभियान जोमाने राबवत आहे. संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी आणि नद्यांतील पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी हे अभियान युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत 39.04 किलोमीटर नदीपात्राची सफाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 30,065 क्यूबिक मीटर गाळ हटवण्यात महापालिकेस यश आले आहे. या अभियानांतर्गत, नाग नदीची 11.84 किमी, पोहरा नदीची 12.76 किमी आणि पिवळी नदीची उर्वरित लांबी स्वच्छ करण्यात आली आहे.
मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आणि अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात हे काम यशस्वीरीत्या सुरू आहे. नागपूर शहरातील या तिन्ही नद्यांची एकूण लांबी 49.17 किमी असून, पावसाळ्याच्या आधी 100 स्वच्छतेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.या स्वच्छता मोहिमेसोबतच नागपूर शहरातील पाणीपुरवठा, नागनदी व पोहरा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, शासकीय कॅन्सर रुग्णालयासाठी निधी, सीताबर्डी भागातील हॉकर्सचा प्रश्न आणि नवीन नागपूरसंबंधी आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक नागपूर मनपा मुख्यालयात घेण्यात आली.

पार्किंग धोरणात बदल
बैठक केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीस महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नितीन राऊत, भाजप शहर जिल्हाध्यक्ष दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, माजी नगरसेवक, पदाधिकारी व विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.नाग नदीच्या अंबाझरी तलाव ते पारडी उड्डाणपूल दरम्यान पाच टप्प्यांत काम पूर्ण झाले आहेत. यातून सुमारे 20 हजार 254 क्यूबिक मीटर गाळ काढण्यात आला.
पोहरा नदीच्या सहकार नगर घाट ते नरसाळा विहिरगाव दरम्यान तीन टप्प्यांत 5 हजार 201 क्यूबिक मीटर गाळ हटवण्यात आला आहे. पिवळी नदीवरही याच धर्तीवर काम सुरू आहे. नागपूरच्या सीताबर्डी मुख्य रस्त्यावर विक्री क्षेत्र दर्जा रद्द करण्यात आला असून वाहतूक नियमनासाठी नवीन पार्किंग धोरण राबवण्यात आले आहे. नागपूर पोलिसांनी दिलेल्या अधिसूचनेनुसार, या रस्त्यावर आता वाहने पार्क करण्यास पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. डीसीपी चांडक यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी वाहनांना रस्त्याच्या डाव्या बाजूस आणि चारचाकींना उजव्या बाजूस पार्किंगसाठी जागा उपलब्ध असेल.
परंतु फक्त तेथील रस्ता पुरेसा रुंद असेल तेव्हाच. अरुंद रस्त्यांवर दोन्ही बाजूंनी केवळ दुचाकींना पार्किंगची परवानगी असेल.नागपूर शहराचे सुव्यवस्थित नियोजन, पूर प्रतिबंधक उपाययोजना, आरोग्य सेवा आणि बाजारातील वाहतुकीचे नियमन या सर्व मुद्द्यांवर झालेल्या चर्चेतून स्पष्ट होते की, नागपूरला एक स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक शहर बनवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी व नागरिक एकत्रितपणे काम करत आहेत.