बुलढाण्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा अधिक जोर धरू लागल्या आहेत. काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत असलेल्या सानंदा यांच्या या निर्णयाने जिल्ह्यात मोठी राजकीय खळबळ उडाली आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी थेट शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. काँग्रेसच्या नव्या नेतृत्वामुळे अस्वस्थ झालेले सानंदा आता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना अधिक जोर आला आहे. जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं, असे मोठमोठे दावे करणारे सानंदा आता पक्षांतराच्या उंबरठ्यावर उभे आहेत, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
राजकीय भूमिकांची अदलाबदल करणे काही नवीन नाही, पण काँग्रेसच्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी थेट शिंदे गटाशी जवळीक वाढवणे हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सानंदा यांचे नाव वेगवेगळ्या पक्षांशी जोडले जात होते. आधी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, आता त्यांनी थेट शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांचा पुढचा राजकीय प्रवास निश्चितच काँग्रेसच्या हिताचा राहणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
Mahayuti : लाडक्या बहिणींना सुखी करण्याचा प्रयत्नात नेते झालेत दुःखी
बंद दाराआड चर्चा
मुंबईत झालेल्या या भेटीत नेमके काय चर्चा झाली, हे अधिकृतरीत्या सांगितले जात नसले तरी सानंदा यांचा आगामी राजकीय निर्णय काय असणार, याची चुणूक याच बैठकीत दिसली. जवळपास तासभर झालेल्या या चर्चेत काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची मानसिक तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या भेटीवेळी बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड देखील उपस्थित होते.
सत्ताधारी गटाच्या नेत्यांसोबत अशी अचानक बैठक होणे म्हणजे मोठे राजकीय घडामोडींचे संकेत मानले जात आहेत. गेल्या काही वर्षांत काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांची नाराजी स्पष्ट झाली आहे आणि पक्षाचे अनेक मोठे चेहरे एका मागोमाग एक बाहेर पडताना दिसत आहेत. सानंदा यांची भेटही अशाच एका नव्या राजकीय इनिंगची नांदी मानली जात आहे.
काँग्रेससाठी मोठा धक्का
काँग्रेसकडून 2024 च्या विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवून पुन्हा पराभूत झालेल्या सानंदा यांनी काँग्रेसच्या नव्या नेतृत्वावर फारसं समाधान नसल्याचे वारंवार सूचित केले होते. त्यातच हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपद दिल्यानंतर बुलडाण्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. परिणामी, पक्षातील जुने निष्ठावान नेतेही आता वेगवेगळे पर्याय शोधू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सानंदा यांचा शिवसेना शिंदे गटाकडे कल वाढणे म्हणजे काँग्रेससाठी आणखी एक मोठा धक्का ठरणार आहे. त्यांच्या या भेटीनंतर बुलडाणा जिल्ह्यात काँग्रेसचे काही मोठे नेतेही पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
सानंदा यांचा वेळकाढूपणा
मी एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक कामासाठी भेटलो. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असा खुलासा सानंदा यांनी केला असला, तरी त्यांच्या या स्पष्टीकरणावर फारसा विश्वास ठेवला जात नाही. राजकीय वर्तुळात ही भेट म्हणजे आगामी पक्षांतराची नांदी मानली जात आहे. काँग्रेस नेतृत्वावर वाढता रोष आणि पक्षातील गोंधळ यामुळे सानंदा यांना शिवसेना हा एक उत्तम पर्याय वाटत आहे.
त्यांचा हा प्रवास तिथेच थांबणार नाही, असे जाणकार सांगतात. शिवसेनेत प्रवेश करून ते आगामी निवडणुकीसाठी तयारी करत असल्याची चर्चा आता उघड होत आहे. काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावणाऱ्या या हालचाली काँग्रेससाठी आणखी एक संकट ठरणार आहे.
अखेरचा जय महाराष्ट्र
एकेकाळी विलासराव देशमुख यांच्या निकटच्या विश्वासू लोकांमध्ये गणले जाणारे दिलीपकुमार सानंदा आज काँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत. पक्षात उरलेले काही गिनेचुने निष्ठावंत नेतेही आता डळमळीत होऊ लागले आहेत. त्यामुळे जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हूं, म्हणणाऱ्या सानंदा यांचा काँग्रेसला अखेरचा जय महाराष्ट्र लवकरच पाहायला मिळणार, असा अंदाज लावला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसच्या भवितव्यावर हा निर्णय काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत फुटीची प्रक्रिया वेग घेत आहे आणि विरोधक त्याचा पुरेपूर फायदा घेत आहेत.