महाराष्ट्र

Dhananjay Munde : भंडाऱ्याच्या वाल्मिक कराडचा काळा चिठ्ठा तयार

NCP : तीन भाऊ मिळून खाऊ प्रकार; मंत्र्याच्या नावाचा वापर

Post View : 27

Author

बीड जिल्ह्यील सरपंचाच्या हत्येचे प्रकरण धनंजय मुंडे यांच्या अंगलट आलं आहे. वाल्मिक कराड अन् मुंडे यांचा संबंध असलेले अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यामुळं मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला आहे. असाच एक वाल्मिक कराड भंडारा जिल्ह्यातही आहे. मुंडे यांच्या नावाचा वापर करीत त्यानं केलेल्या काळ्या कारनाम्यांची कुंडली सध्या तयार होत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळं उडालेले रक्ताचे डाग मंत्री धनंजय मुंडे यांच्यापर्यंत पोहोचले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा घेतला आहे. वाल्मिक कराड यांनं बीड जिल्ह्यात निर्माण केलेली दहशत यामागं कारणीभूत ठरली आहे. असाच एक वाल्मिक कराड विदर्भातील भंडारा जिल्ह्यातही आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाचा सर्रास वापर करीत त्यानं अनेक ‘कर्म’ अन् ‘कांड’ केले आहेत. तीन जणांचं हे टोळकं आहे. तीन भाऊ मिळून खाऊ असा सपाटा त्यांनी लावला आहे. महसूल विभागातील एक वरिष्ठ अधिकारीही यात सामील आहे.

भंडाऱ्यातील या दुसऱ्या वाल्मिक कराडची कुंडली तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यासाठी महाविकास आघाडीतील काही नेते कामाला लागले आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेकांना भंडाऱ्यातील या वाल्मिक आणि मुंडे यांचे संबंध असल्याचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ज्या क्षणी भंडाऱ्यातील या कराडसह हे तिघेही हातात सापडतील, त्यावेळी जोरदार फटका देण्याची चौफेर तयारी पूर्ण झालेली आहे. यासाठी महसूल विभागातीलच काही लोक गुप्तचर म्हणून संबंधितांच्या मागावर आहेत.

Mahavikas Aghadi : यंदाच्या होळीला महायुतीविरुद्ध शिमगा

ओव्हरकॉन्फिडन्स भोवणार

भंडाऱ्यातील वाल्मिक कराडकडून धनंजय मुंडे यांच्या नावाचा गेल्या अनेक दिवसांपासून वापर सुरू आहे. यासंदर्भातील जाणीव मुंडे यांनाही असल्याची माहिती आहे. त्यामुळं या कृत्याला मुंडे यांचं पाठबळ असल्याचा आरोप आता होत आहे. आपलं गुन्हेगारी साम्राज्य मोठं करण्यासाठी महसूल विभागात कार्यरत एका तहसीलदाराची मदतही या वाल्मिककडून घेतली जात आहे. भंडाऱ्यातील वाल्मिकनं आपल्या या तहसीलदार मित्राच्या मदतीनं आतापर्यंत कोट्यवधी रुपयांची हेराफेरी केली आहे. मात्र लवकरच या वाल्मिकच्या कुंडलीतील ग्रह फिरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोणत्याही क्षणी या वाल्मिकच्या काळ्या कारनाम्यांचा कच्चा चिठ्ठा चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

बीडमधील वाल्मिक कराडमुळं धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता त्यांना हत्या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. सरकारनं यासंदर्भात दुर्लक्ष केलं तर प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात आहे. न्यायालयाकडून आदेश आल्यानंतर सरकारला धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावेच लागेल. अशीच तयारी भंडाऱ्यातील वाल्मिक कराडबाबतही सुरू आहे. यासाठी अनेक फोटो, व्हिडीओ, कागदपत्र, सीसीटीव्ही फूटेज, मोबाइलचा तपशील, मेसेज गोळा केले जात आहेत. कोणत्याही क्षणी भंडाऱ्यातील वाल्मिक कराडवर ‘कानुन का शिकंजा’ कसला जाईल असं चित्र आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!