महाराष्ट्राच्या राजकारणातील अर्थशास्त्राचे चाणक्य समजले जाणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना त्यांच्या अप्रतिम कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.
लंडनच्या वैभवशाली मंचावर, जिथे जगभरातील दिग्गजांचा मेळावा जमला होता. तिथे महाराष्ट्राच्या मातीतून उगवलेला एक तारा चमकला. चंद्रपूरचे अभ्यासू आणि जनसेवेचा अखंड ध्यास असलेले माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शनमध्ये ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १८ ऑगस्ट रोजी हा सन्मान महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सपत्नीक उपस्थित असलेल्या सुधीर मुनगंटीवारांनी हा क्षण आपल्या कार्याला मिळालेली प्रेरणा मानली. हा पुरस्कार माझ्या जनसेवेच्या संकल्पाला बळ देणारा आहे.
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी शेवटच्या श्वासापर्यंत कार्यरत राहील,” असे त्यांनी भावूकपणे सांगितले. या पुरस्काराने लंडनच्या ऐतिहासिक भूमीत महाराष्ट्राचा गौरव वाढला. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे भारतात परत आणण्याचे ऐतिहासिक कार्य करणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांना त्याच लंडनच्या मातीत हा सन्मान मिळाला. हा केवळ त्यांचा वैयक्तिक विजय नाही, तर चंद्रपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. ‘ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’मध्ये भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या वाटचालीवर चर्चा झाली. जागतिक व्यापार, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि हरित ऊर्जा यावर विचारमंथन झाले.
Yashomati Thakur : भाजपच्या छत्रछायेत अध्यात्माच्या नावाखाली हिंसेचा प्रकार
नेतृत्वाची जागतिक पावती
भव्य व्यासपीठावर सुधीर मुनगंटीवारांचा सन्मान होणे, त्यांच्या बहुआयामी नेतृत्वाची जागतिक पातळीवर पावती आहे.सुधीर मुनगंटीवार यांचा हा प्रवास पुरस्कारांचे एक सुवर्णदालन आहे. गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने त्यांना दिलेली डी.लिट. पदवी, आज तक आणि इंडिया टुडेकडून दोनदा मिळालेला बेस्ट फायनान्स मिनिस्टर इन इंडिया पुरस्कार, स्व. अरुण जेटली यांच्या हस्ते झालेला गौरव, चार लिम्का रेकॉर्ड, दोन गिनेस बुक रेकॉर्ड, वृक्षलागवडीसाठी मिळालेला देशगौरव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात मधील विशेष उल्लेख आणि त्यांच्या कार्यालयाला मिळालेला देशातील पहिला ISO दर्जा यासारख्या सन्मानांनी त्यांचा मार्ग उजळला आहे.
महाराष्ट्रियन ऑफ द इयर आणि फेम इंडिया उत्कृष्ट मंत्री पुरस्कारानेही त्यांचे कार्य झळकले आहे. ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ हा पुरस्कार केवळ सुधीर मुनगंटीवार यांचा नाही, तर तो महाराष्ट्राच्या अस्मितेचा, त्याच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सन्मान आहे. चंद्रपूरच्या ग्रामीण मातीतून उभे राहिलेले हे नेते, ज्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि विकासदृष्टीने सर्वांना प्रभावित केले. आज जागतिक मंचावर महाराष्ट्राचा गौरव वाढवत आहेत. त्यांच्या नेतृत्वातील निष्ठा आणि जनसेवेची तळमळ यामुळे हा सन्मान त्यांना मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा क्षण आहे. ज्यामुळे आपल्या मातीतून उगवलेल्या या हिऱ्याची चमक जगभर पसरली आहे.
B. Sudarshan Reddy : न्यायालयीन जगताचे स्टार, आता उपराष्ट्रपती पदासाठी उभे
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्याने दाखवून दिले आहे की, खऱ्या अर्थाने जनसेवा आणि विकासाची दृष्टी यामुळे कोणत्याही सीमा ओलांडता येतात. त्यांच्या या सन्मानाने चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्राला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळाली आहे. हा कोहिनूर फक्त पुरस्कार नाही, तर महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि त्याच्या नेतृत्वाच्या सामर्थ्याचा जागतिक मंचावर उमटलेला ठसा आहे.
