महाराष्ट्र

Amravati : आमदारांची वीजयंत्रणेला ‘रेडी फॉर रेन्स’ कमांड

Sulbha Khodke : अमरावतीच्या विद्युतनाडीला मिळणार नवजीवन

Author

पावसाआधी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आमदार सुलभा खोडके यांनी महावितरण अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. विश्वसनीय वीजसेवेसाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या.

शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि आगामी मान्सून हंगाम लक्षात घेता अमरावतीतील वीजपुरवठा यंत्रणेची कार्यक्षमता आणि स्थैर्य वाढविणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. ही गरज ओळखून आमदार सुलभा खोडके यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (महावितरण) अधिकाऱ्यांची नुकतीच सखोल आढावा बैठक घेतली. बैठकीदरम्यान त्यांनी शहरातील वीजसंबंधित समस्या, उपाययोजना आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणाबाबत थेट सूचना दिल्या.

बैठकीत बोलताना आमदार खोडके म्हणाल्या की, मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीची कामे ही फक्त औपचारिकता न राहता, ती गतीने आणि परिणामकारकरित्या पूर्ण झाली पाहिजेत. नागरिकांचा विश्वासार्ह आणि अखंड वीजपुरवठा आमच्या कामाचा केंद्रबिंदू असावा. महत्वाची बाब म्हणजे अमरावतीच्या विविध भागांतील वीजभार वाढत चालला आहे. त्यामुळे 11 कोटी रुपये निधीतून शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, राजापेठ पोलीस स्टेशन, रहाटगाव (अमरावती-नागपूर रोड) आणि ट्रान्सपोर्ट नगर येथे 33/11 के. व्ही. उपकेंद्रांची स्थापना करण्याची प्रक्रिया त्वरीत गतिमान करण्याची मागणी आमदार खोडके यांनी केली.

तातडीने उपलब्धता

गाडगे नगर व नवसारी येथील वितरण केंद्रांवर असलेला ताण लक्षात आणला. ही केंद्रे विभागून नवीन वितरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. शहरात भूमिगत वीजवाहिन्यांची संख्या वाढत आहे. त्यांच्या देखभाल व चाचणीसाठी ‘केबल टेस्टिंग व्हॅन’ तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. वीजवाहिन्यांवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी शक्तिमान ‘कटिंग मशीन’चा समावेश करण्याचेही आदेश देण्यात आले.

आगामी पावसाळा लक्षात घेता, सर्व ओव्हरहेड लाईन्स, भूमिगत केबल्स आणि सबस्टेशन्समधील खराब झालेले किंवा जीर्ण भाग तातडीने दुरुस्त करणे. ट्रान्सफॉर्मरची तपासणी आणि आवश्यक त्या दुरुस्त्या, इन्सुलेटरचे परीक्षण व बदली, वीजखांबांचे मजबुतीकरण करण्यात यावे. फांद्यांचे छाटणी यांसारख्या कामांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश यावेळी देण्यात आला. शहरातील कमी क्षमतेच्या वितरण रोहित्रांची क्षमता वाढविण्यासाठी 113 वितरण रोहित्रांचे ‘औग्मेंटेशन’ सुरु असल्याची माहिती यावेळी महावितरणने दिली. याशिवाय, 13 नवीन वितरण रोहित्रांची उभारणीही नियोजित असून त्यासाठी आवश्यक निधी आणि योजना अंतिम करण्यात आली आहे.

तांत्रिक देखभाल

आढावा बैठकीत ट्रान्सफॉर्मर ऑईल लेव्हल तपासणी, अर्थिंग सिस्टीमचे बळकटीकरण, पॉवर सबस्टेशन्सची देखभाल यासारख्या तांत्रिक बाबींवरही भर देण्यात आला. यामुळे संभाव्य बिघाड टाळता येईल आणि पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल. नागरिकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून कुठलीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सुलभा खोडके यांनी दिला. महावितरण विभागाने ठरवलेल्या कालमर्यादेत सर्व कामांची पूर्तता केली पाहिजे, अशी त्यांची ठाम भूमिका होती.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!