महाराष्ट्र

Akola GMC : डीनच्या उद्धट वर्तनाने पेटली मनसे

MNS Complaint : अकोल्यात वैद्यकीय महाविद्यालयात तणावाचं वातावरण

Post View : 28

Author

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डीन डॉ. संजय सोनुने यांच्या वर्तनावरून वाद पेटला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर वैद्यकीय शिक्षण विभागाने चौकशी समिती नेमल्याने या घटनेने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला येथे एक धक्कादायक घडामोड घडली असून अधिष्ठाता (डीन) डॉ. संजय सोनुने यांच्या वर्तनाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने औपचारिक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग, मुंबई यांनी चौकशी समिती नेमल्याची माहिती पुढे आली आहे.

मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहराध्यक्ष सौरभ भगत, उपजिल्हाध्यक्ष सतीश फाले आणि मनविसे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांनी संयुक्त निवेदनाद्वारे ही तक्रार सादर केली आहे. या तक्रारीनुसार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता मनसेचे पदाधिकारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले होते. खासगी व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांविरोधात तसेच बाह्यस्रोत मनुष्यबळ पुरवणाऱ्या ‘स्मार्ट सर्व्हिसेस’ या कंपनीच्या गैरकारभारासंदर्भात निवेदन देण्यासाठी ते डीन डॉ. सोनुने यांना भेटले होते.

Meditrina Hospital : कोठडी वाढवून पोलिसांनी कारस्थानाचे धागे शोधले

कारवाईची मागणी

तक्रारीनुसार डॉ. सोनुने यांनी निवेदन स्वीकारण्यास नकार देत “तुम्हाला जे करायचे आहे ते करा” अशा शब्दांत उद्धट प्रतिसाद दिला. याचदरम्यान त्यांनी तक्रारदारांशी असभ्य हातवारे करत दार बंद केले आणि मागील मार्गाने कार्यालयातून बाहेर पडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांनी ही घटना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कलम तीन आणि चारचे उल्लंघन असल्याचे नमूद केले असून, डीनविरोधात शिस्तभंगात्मक कारवाईची मागणी केली आहे.

सदर तक्रार प्राप्त झाल्यानंतर संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग, मुंबई यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चौकशी समिती नेमल्याचे समजते. संबंधित समिती लवकरच घटनेची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, पुढील 15 दिवसांत समाधानकारक कारवाई न झाल्यास ही बाब राज्य सरकारच्या तक्रार निवारण पोर्टलवर आणि थेट मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत नेली जाईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!