संसदेच्या लॉबीत जय महाराष्ट्र म्हणणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्मान करण्यात आला. मराठी अस्मितेच्या संरक्षणासाठी उभ्या राहिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्राच्या अस्मितेचा अभिमान बाळगणाऱ्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविभवन येथे थाटात सत्कार करण्यात आला. दिल्लीच्या संसद भवनात भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्याविरोधात ठाम भूमिका घेतल्यामुळे त्यांच्या या धाडसी कृतीचे मनसेतर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. या प्रसंगी मनसेच्या नेत्या व कार्यकर्त्यांनी जय महाराष्ट्रचा नारा देत धनोरकर यांच्यावरील प्रेम व्यक्त केले.
दिल्लीतील संसदेच्या लॉबीत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाचा प्रतिकार करत प्रतिभा धानोरकर यांनी इतर मराठी खासदारांसह त्यांना जाब विचारला. त्यांचा आक्रमक पण संयत पवित्रा पाहून निशिकांत दुबे यांना तिथून जय महाराष्ट्र म्हणत काढता पाय घ्यावा लागला. ही घटना संसद भवनातील कॅन्टीनजवळ घडली असून, तिची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे.
Chandrashekhar Bawankule : गुब्बाऱ्यांचं राज्य नाही, विकासाचं वादळ म्हणजे मोदी
स्त्रीशक्तीचा भेदभावाला रोख
प्रतिभा धानोरकर यांनी पक्षभेद विसरून केवळ मराठी अस्मितेसाठी उभं राहण्याचं उदाहरण उभं केलं. त्यांच्या सोबत काँग्रेस, शिवसेना आणि इतर मराठी पक्षांच्या महिला खासदारांनीदेखील निशिकांत दुबे यांच्या विधानांचा जोरदार निषेध केला. महिला खासदारांच्या या एकजूट कृतीमुळे महाराष्ट्रातील महिलांचे नेतृत्व अधिक दृढ आणि आत्मभिमानी असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. या प्रकरणानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी धानोरकर आणि इतर महिला खासदारांच्या धाडसाचे कौतुक केले होते. मराठी स्वाभिमानासाठी महिला खासदारांनी घेतलेला पवित्रा हा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आत्मसन्मान जागवणारा ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले. याच पार्श्वभूमीवर रविभवन येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात प्रतिभा धानोरकर यांना पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
महाराष्ट्रात मागील काही महिन्यांपासून हिंदी- मराठी भाषिकांमधील तणावाला पुन्हा एकदा उधाण आलं आहे. राज्यातील शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्तपणे सभा घेत मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकत्र येण्याचं जाहीर केलं होतं. मनसेने आधीपासूनच परप्रांतीयांच्या अरेरावीला विरोध करत मराठी भाषेला प्राधान्य देण्याची भूमिका घेतली होती. मुंबईसारख्या महानगरात मराठी भाषिकांची संख्या घटत असतानाही राजकारणात मराठी मतदारांचे महत्त्व कमी होत चालल्याचा आरोप विविध मराठी संघटनांकडून होतो. अशा परिस्थितीत भाजप खासदार दुबे यांच्या विधानांमुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती.
धानोरकर यांची भुमिका
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी व हिंदी मतदारांमध्ये भेदभाव निर्माण करून हिंदी भाषिकांचे मत आपल्याकडे वळवण्याचा डाव भाजपने रचल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. अशा वेळी प्रतिभा धानोरकर यांची संसद लॉबीत घेतलेली भुमिका केवळ राजकीय नव्हे, तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत निर्णायक ठरली. मराठी महिलांचा आवाज या घटनेमुळे संपूर्ण देशभर दुमदुमला. प्रतिभा धानोरकर यांचं हे कृत्य मराठी राजकारणात नव्या विश्वासाचं प्रतीक ठरत आहे. पक्षभेद विसरून एका मराठी महिलेने संपूर्ण देशासमोर महाराष्ट्राचा आवाज बुलंद केल्यामुळे त्यांचं नाव आता अभिमानाने घेतलं जात आहे. मनसेकडून झालेला त्यांचा सत्कार हा फक्त सन्मान नव्हे, तर महाराष्ट्रातील असंख्य महिलांसाठी प्रेरणादायी ठरणारा संदेश आहे.