
नागपुरात विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांसाठी अत्याधुनिक टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली आहे.
नागपूर म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसलेले एक बहुरंगी शहर. एकीकडे संत्र्यांचा गोडवा, तर दुसरीकडे ऐतिहासिक वारसा आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेले हे शहर आहे. देशाच्या भौगोलिक केंद्रस्थानी असलेल्या नागपूरला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया देखील म्हणतात.
विदर्भाची राजधानी असलेल्या नागपूरमध्ये दीक्षाभूमीचा पवित्र प्रकाश, रामटेकचा ऐतिहासिक ठेवा, आणि अंबाझरीच्या किनाऱ्यावरचा निसर्गसौंदर्याचा श्वास आहे. इथली झिरो माईल खुण म्हणून उभा असलेला स्तंभ भारताच्या मध्यवर्ती भूमीचे प्रतीक आहे. मात्र याच भूमीवर अनके राजकीय निर्णय देखील घेतले जातात. मंत्रिमंडळाची शपथ असो, की विधिमंडळाचे अधिवेशन याच उपराजधानीत पार पडतात.

महाविकास आघाडीने विकास रोखला, भाजपने निधी मिळवण्यासाठी लढा उभारला
हायटेक निवासस्थान
राज्य मंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या नाग भवनाला लवकरच नव्या युगाचे रूप मिळणार आहे. नागपूरमध्ये विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मंत्र्यांसाठी नवे अत्याधुनिक टॉवर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भव्य योजनेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 227 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. लवकरच राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातही याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. नव्या नाग भवनासाठी तब्बल 10 हजार कोटी रुपये खर्च करून आठ मजली अत्याधुनिक इमारत उभारली जाणार आहे. नाग भवनमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. येथे विधिमंडळ अधिवेशनादरम्यान राज्यमंत्री आणि उच्चस्तरीय सचिव वास्तव्यास असतात.
मुख्यमंत्री रामगिरी येथे, तर उपमुख्यमंत्री देवगिरी आणि विजयगड येथे राहतात. मंत्र्यांसाठी रविभवन तर आमदारांसाठी आमदार निवास आहे. मात्र, नाग भवनातील काही झोपड्या आणि इमारती आता जुन्या झाल्याने त्या राहण्यायोग्य राहिलेल्या नाहीत. याच पार्श्वभूमीवर, सार्वजनिक बांधकाम विभागाने एक नवा प्रस्ताव तयार केला आहे, ज्याला पालकमंत्री बावनकुळे यांनी त्वरित मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव आता पुढील मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. तिथे अर्थसंकल्पीय मंजुरी मिळाल्यास लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होण्याची शक्यता आहे.
इमारतीच्या भव्यतेचा अंदाज
नाग भवनाचा हा नवा टॉवर एकूण 17025 चौरस फूट जागेत उभारला जाणार आहे. पहिल्या ते सहाव्या मजल्यांवर प्रत्येकी चार अशा 24 व्हीआयपी खोल्या असतील. या खोल्यांमध्ये स्वतंत्र ऑफिस, बेडरूम, बैठक खोली आणि पार्किंगची विशेष सुविधा असेल.
तळमजल्यावर अत्याधुनिक स्वागत कक्ष, प्रशस्त लॉबी, आलिशान लॉन आणि मोठा कॉन्फरन्स हॉल असेल. याशिवाय, प्रतीक्षालय आणि चार सभा गृहेही येथे तयार करण्यात येणार आहेत.
SSC Board Exam : पहिल्याच दिवशी उडाला कॉपीमुक्त अभियानाचा धुराळा
संपूर्ण सोयीसुविधा
नव्या इमारतीमध्ये आधुनिक सुरक्षाव्यवस्था असणार असून, व्हीआयपींच्या सुरक्षिततेसाठी विशेष तजवीज केली जाईल. याशिवाय, मंत्र्यांना तणावमुक्त राहण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य जपण्यासाठी व्यायाम कक्ष आणि कॉफी शॉपही असणार आहे. या अत्याधुनिक इमारतीमुळे मंत्र्यांना सर्व सुविधा एका ठिकाणी मिळणार असून, अधिवेशनादरम्यान त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
सध्या नाग भवनमध्ये 16 झोपड्या आहेत, पण सरकारने या झोपड्यांना हात न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मुख्य इमारत पाडून त्याच्या जागी ही अत्याधुनिक इमारत उभारली जाईल. तसेच, या संकुलातील 16 कॉटेजनाही नवीन रूप दिले जाणार आहे. या संपूर्ण प्रकल्पाची पुष्टी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, हा प्रस्ताव विभागाच्या सचिवांकडे पाठवण्यात आला असून, लवकरच यास अंतिम मंजुरी मिळेल.