सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारताच्या जागतिक प्रगती आणि दबदब्यावर सडेतोड भाष्य केले. त्यांनी टॅरिफवर, भीतीवर आणि भारताच्या नैतिक व सांस्कृतिक प्रगतीवर आपले स्पष्ट विचार मांडले.
भारताच्या वाढत्या प्रभावाने जागतिक मंचावर खळबळ उडाली आहे. या प्रबळ उदयामुळे काही राष्ट्रांना अस्वस्थता जाणवत आहे. भारतावर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या कार्यक्रमात बोलताना हा मुद्दा उपस्थित केला. भारताच्या प्रगतीला पाहून काही देशांना आपले स्थान धोक्यात येईल, अशी भीती वाटते. भारताचा प्रभाव वाढला, तर आमचे काय होईल? या भयग्रस्त मानसिकतेतूनच टॅरिफसारखे निर्णय घेतले जातात, असा टोला भागवत यांनी लगावला. भारत हा केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी नव्हे, तर संपूर्ण जगाला दिलासा आणि समृद्धी देण्यासाठी प्रगतीपथावर आहे, हे त्यांनी ठामपणे मांडले.
भागवत यांनी सांगितले की, ‘मी’ आणि ‘माझे’ यांच्या संकुचित विचारसरणीमुळे जागतिक समस्यांचा उगम होतो. ‘आम्ही’ आणि ‘आमचे’ या सामूहिक दृष्टिकोनातूनच विश्वातील संघर्षांचे निराकरण शक्य आहे. भारताचा दृष्टिकोन हा सर्वसमावेशक आहे. आपली प्रगती ही केवळ स्वतःपुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. भारताला मोठे व्हायचे आहे, पण हे मोठेपण आक्रमण किंवा लूट यांच्यावर आधारित नाही, तर विश्वाला शांतता आणि समाधान देण्याच्या उदात्त हेतूवर आहे.
सांस्कृतिक मूल्ये
मोहन भागवत यांनी एका प्राचीन कथेचा दाखला देत सांगितले की, विषारी सापही त्याच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्यावरच चावतो. यातून त्यांनी सूचकपणे सांगितले की, भारत हा शांततेचा पुरस्कर्ता आहे. परंतु, त्याच्या प्रगतीला आव्हान देणाऱ्यांना योग्य उत्तर देण्याची क्षमताही भारतात आहे. भारताचा प्रभाव हा केवळ भौतिक प्रगतीपुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित आहे.
Harshwardhan Sapkal : ऐश्वर्याची गाडी धावते, परिश्रमाची पावले थबकतात
भारताचा उदय हा केवळ आर्थिक किंवा राजकीय नाही, तर तो सांस्कृतिक आणि नैतिक आहे. भागवत यांनी स्पष्ट केले की, भारताला जगाला दिलासा द्यायचा आहे. इतर देश स्वतःच्या प्रगतीसाठी इतरांना कमी लेखतात, परंतु भारताचा मार्ग वेगळा आहे. आपली प्रगती ही संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी आहे. भारत हा एक असा देश आहे. जो स्वतःला राष्ट्राच्या रूपात ओळखतो आणि सर्वांना समृद्धीचा मार्ग दाखवतो. अशा या प्रेरणादायी विचारांनी भागवत यांनी भारताच्या जागतिक भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले.