महाराष्ट्र

Yashomati Thakur : गतिमान सरकारचा टीएआयटी निकाल घोटाळ्यात हरवला

MSCE TAIT Result : दोन लाख तरुणांची भविष्यं फाईलच्या ढिगाऱ्यात गाडली

Author

महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ निकाल रखडल्याने लाखो उमेदवार असंतोषात आहेत.

महाराष्ट्रात शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी – TAIT 2025) झाली. त्याला आता तब्बल 50 दिवस उलटून गेलेत. तरीदेखील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) निकाल जाहीर करायला तयार नाही. परिणामी राज्यातील सुमारे 2 लाख उमेदवार ताटकळलेत, संभ्रमात असून संतप्तही झालेत. ही परीक्षा 27 मे ते 5 जून 2025 दरम्यान ऑनलाइन पद्धतीने पार पडली. पण या परीक्षेचा निकाल का रखडतोय, यावर परीक्षा परिषद किंवा शिक्षण विभागाकडून कोणतीही स्पष्टता नाही. मागच्या वर्षी हा निकाल अवघ्या 21 दिवसांत जाहीर झाला होता, हे लक्षात घेतले तर यंदाचा उशीर अधिकच संशयास्पद वाटतोय.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक उमेदवार ज्ञानेश्वर घोडके म्हणतात, हा आमच्या भविष्यासंदर्भातला प्रश्न आहे. निकाल नाही, भरती नाही, मग आमच्या मेहनतीचे काय? अशा असंख्य उमेदवारांच्या भावना सोशल मीडियावर उसळत आहेत. यासंदर्भात परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले की, बीएड व डीएडच्या अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. त्यामुळे सर्व उमेदवारांचा निकाल एकत्रच लावला जाईल. पण त्यानंतर एक महिना उलटून गेला, तरी काही विद्यापीठांचे निकाल आलेलेच नाहीत. मात्र आश्चर्य म्हणजे, 2 मे रोजीच्या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते की, अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल वेगळा लावण्यात येईल.

Mehboob Mujawar : मोहन भागवतांना अटक करण्याचा होता आदेश 

युवांमध्ये अस्वस्थता वाढली

परिषद आता जुनी कारणे देऊन निकाल का रोखतेय? या सर्व प्रकारावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातील युवा तरुण आधीच बेरोजगारीने अस्वस्थ आहेत. अशात शिक्षक भरतीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियांमध्ये होणारा वेळ आणि अपारदर्शकता हे केवळ गोंधळाचे लक्षण नाही, तर तरुणांच्या भविष्याशी खेळ आहे, असं त्या म्हणाल्या. टीएआयटी निकालच जाहीर झाला नाही, तर उमेदवार शिक्षक भरतीत सहभागी कसे होणार? दुसरीकडे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांचे हक्क हिरावले जात आहेत. हे गतीमान सरकार आहे की गोंधळ सरकार? असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी तातडीने निर्णय घेऊन निकाल जाहीर करावा. उमेदवारांची प्रतीक्षा संपवा आणि नोकरभरती प्रक्रियेसाठी त्यांना योग्य मार्ग मोकळा करून द्या, असं आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले आहे. तरुणांचे भविष्य ताटकळवणे  म्णजे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरवणे. ही कोंडी सरकारने तात्काळ फोडली पाहिजे. अन्यथा लाखो तरुणांचा रोष सत्ताधाऱ्यांवर फुटल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा ठाकूरांनी दिला.

Manikrao Kokate : रमीने संपवला खेळ; ‘कृषी’ नावाचं ताज दादांनी ‘खेळा’त बदलून टाकलं

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!