महाराष्ट्र

महावितरणनं Ramtek मध्ये पकडली सर्वांत मोठी वीजचोरी

देवलापार येथील Rice Mill मध्ये सुरू होता गैरप्रकार

Share:

Author

वीज चोरी पकडण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीनं कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतची सगळ्यात मोठी वीज चोरी पकडण्यात आली आहे.

रामटेक तालुक्यात असलेल्या देवलापार येथे महावितरणच्या भरारी पथकानं आतापर्यंतची सगळ्यात मोठी वीज चोरी पकडली आहे. देवलापार येथील ताज राइस मिलमध्ये ही वीज चोरी सुरू असल्याचं महावितरणच्या भरारी पथकाला आढळलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की मिलमध्ये सुमारे एक कोटीपेक्षा जास्त रकमेची चोरी सुरू होती. महाविरतणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव नारखेडे यांच्या पथकानं ही कारवाई केली.

नागपूर शहरातील भरारी पथकानं ही कारवाई केली. शहरातील हे भरारी पथक रामटेक भागात तपासणीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी देवलापार येथील जात राइस मिलची तपासणी केली. वीज पुरवठा करणाऱ्या उपकरणांची तपासणी यावेळी करण्यात आली. त्यावेळी अधिकाऱ्यांना थ्री फेजच्या औद्योगिक वीजमीटरला सील नसल्याचं आढळलं. मीटर टर्मिनल कव्हरला सुद्धा सील नव्हते. अधिकाऱ्यांनी मिलमधील प्रत्येक उपकरण सुरू करायला लावलं. त्यानंतर वीज मीटरची तपासणी केली. त्यावेळी त्यांना वापराच्या तुलनेत मीटरमध्ये नोंद होत नसल्याचं आढळलं.

संशयामुळं तपासली DP

मिलमधील उपकरणांची क्षमता आणि कमी नोंद होत असल्यानं अधिकाऱ्यांचा संशय बळावला. त्यामुळं त्यांनी ट्रान्सफर्मरची तपासणी केली. तपासणीच्या वेळी त्यांना योग्य प्रमाणात वीज पुरवठा होत असल्याचं आढळलं. त्यामुळं त्यांनी पुन्हा राइस मिलमधील मीटरच्या तपासणीला सुरुवात केली. या तपासणीत त्यांना सर्व्हिस केबलमध्ये गडबड असल्याचं दिसलं. सर्व्हिस केबलमध्ये अधिकाऱ्यांना दोन ठिकाणी जोड दिसले. केबल आणि मीटरच्या नोंदणीतही फरक आढळला.

वीज मीटरच्या डिस्प्लेमध्ये तफावत आढळल्यानंतर अधिकाऱ्यांनी आणखर कसून तपासणी केली. केबलची तपासणीही करण्यात आली. त्यावेळी मिलमध्ये येणाऱ्या केबलला आणखी एक वायर जोडण्यात आल्याचं दिसलं. दुसऱ्या वायरच्या माध्यमातून राइस मिलला वीज पुरवठा करण्यात येत होता. दुसऱ्या केबलवर मात्र वापरलेल्या विजेची नोंद होत नव्हती. त्यामुळं वीज चोरी पकडली गेली. सुमारे एक वर्षापासून ही वीज चोरी केली जात होती.

मिलमध्ये करण्यात आलेल्या या वीज चोरीच्या माध्यमातून जवळपास पाच लाख युनिटचा वापर करण्यात आला होता. या चोरीमुळं महावितरणचे एक कोटी पेक्षा जास्त रकमेचे नुकसान झालं. त्यामुळं महावितरणच्या अधिकाऱ्यांनी मिलच्या संचालकांविरुद्ध कारवाई केली. रामटेक पोलिस ठाण्यात याप्रकरणी मिलचे मालक शफिक अन्सारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिलच्या मालकांना 13 लाखावर रकमेचा दंडही ठोठावण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी वीज चोरी आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!