महावितरणच्या नव्या प्रस्तावानुसार 300 युनिट्सपर्यंत घरगुती दर लागू होईल, मात्र त्यानंतर व्यावसायिक दर आकारले जातील.
एप्रिलपासून लागू होणाऱ्या नवीन वीजदरांवर महावितरणच्या याचिकेने वादळ उठवले आहे. सरकारकडून वारंवार घरगुती ग्राहकांना कोणतीही अतिरिक्त दरवाढ होणार नाही असे सांगितले जात असले तरी सत्य काही वेगळेच असल्याचे दिसते. महावितरणच्या नव्या प्रस्तावानुसार, घरगुती वीज ग्राहकांना एक अनपेक्षित धक्का बसण्याची शक्यता आहे.
घरगुती ग्राहकांसाठी 300 युनिटपर्यंत सवलतीचा दर लागू असला तरी, घरीच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना मात्र याचा मोठा फटका बसणार आहे. घरात शिकवणी वर्ग, ब्यूटी पार्लर, वकील किंवा डॉक्टरांचे क्लिनिक चालवणाऱ्यांना फक्त 300 युनिट्सपर्यंतच घरगुती दर लागू होईल, त्यानंतर मात्र व्यावसायिक दर आकारले जातील. म्हणजेच, घरी व्यवसाय करणाऱ्या लाखो छोट्या उद्योजकांना याचा मोठा आर्थिक फटका बसेल.
उद्योजकांवर मोठा आघात
महावितरणने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले आहे की, हे दर राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित आहेत. पण हा नियम अतिशय अन्यायकारक असल्याचे ग्राहकांचे मत आहे. घरातच व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना व्यावसायिक वीजदर लावणे म्हणजे त्यांना मोठ्या कंपन्यांच्या तोलामोलाचे मानणे. लाखो बेरोजगार आणि लघुउद्योगांसाठी हा निर्णय घातक ठरू शकतो.
महावितरणच्या प्रस्तावात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे 20 किलोवॉटपेक्षा जास्त भार असलेल्या ग्राहकांसाठी केव्हीएच बिलिंग लागू करण्याचा निर्णय. महावितरणच्या म्हणण्यानुसार, यामुळे सिस्टिममधील व्होल्टेज स्थिर राहील. पण हा नियम फक्त औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी लागू होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. मात्र, यामुळे मोठ्या व्यापाऱ्यांना वीज दर कमी मिळतील आणि लघु व्यवसाय करणाऱ्या सामान्य ग्राहकांना मोठी किंमत मोजावी लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
नूतनीकरणाचा नवा फॉर्म्युला
घरकुल दुरुस्ती करणाऱ्या ग्राहकांसाठी आणखी एक अडचण निर्माण झाली आहे. महिन्याभरात 500 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना घरगुती दर लागू राहील, पण घर पाडून नवे बांधकाम करत असाल तर मात्र वेगळे कनेक्शन घ्यावे लागेल. आणि ते कनेक्शन घरगुती दरानुसार नसेल. अशा परिस्थितीत, एलटी-2 श्रेणी म्हणजेच व्यावसायिक दर लागू होतील. म्हणजेच, ग्राहकांना घर बांधताना जादा पैसे मोजावे लागतील.
नव्या नियमानुसार, एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या घराचा फेरबदल करायचा ठरवला, तरीही त्याला व्यावसायिक दर लागू होतील. म्हणजेच, नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर आधी महावितरणच्या कडक नियमांचा विचार करा.
Vijay Wadettiwar: अनधिकृत रिसॉर्टवर महसूल अधिकाऱ्यांची रंगीन पार्टी
दिलासा की फसवणूक
सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांना पूर्वी ज्या सुविधा दिल्या जात होत्या, त्या बंद झाल्या असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला आहे. मात्र, महावितरणने हे आरोप फेटाळून लावत नेट मीटरिंगमध्ये कोणताही बदल झालेला नसल्याचा दावा केला आहे. यात कोणताही धक्का नाही, असे महावितरण सांगत असले तरी सौरऊर्जा ग्राहक मात्र समाधान मानायला तयार नाहीत.
सध्या या संपूर्ण मुद्द्यावर राज्यभरातून विरोध सुरू झाला आहे. ग्राहकसंघटनांनी हा निर्णय लवकरच मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अनेक ग्राहकांना वाटते की, सरकार आणि महावितरण एकत्र येऊन छुप्या पद्धतीने वीज दर वाढवत आहेत. घरगुती ग्राहकांना प्रथम सवलतीचा गाजर दाखवले जात आहे आणि नंतर त्याच वीज वापरासाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
