नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली पायाभूत सुविधा, उड्डाणपुले, व्यापारी संकुल आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक विकासाला गती मिळाली आहे.
विदर्भाचा हृदयस्थान असलेल्या नागपूर शहराला आता नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यांच्या गृहनगरीला विकासाच्या शिखरावर नेण्याची जिद्द त्यांनी शपथविधीच्या क्षणापासूनच बांधली. पायाभूत सुविधांपासून ते उच्च तंत्रज्ञानापर्यंत, नागपूर आता वेगाने प्रगतीच्या मार्गावर आहे. याच प्रगतीचा एक साक्षीदार ठरला तो, अमरावती मार्गावरील भव्य उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा. केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. ज्यांनी नागपूरच्या विकासाच्या स्वप्नांना नवे बळ दिले. हा उड्डाणपूल म्हणजे केवळ दगड-विटांचा बांधकाम नव्हे, तर नागपूरच्या भविष्याचा एक पूल आहे. जो शहराला प्रगतीच्या नव्या कक्षा गाठण्यासाठी जोडतो.
बोले पेट्रोल पंप चौकापासून नागपूर विद्यापीठ परिसरापर्यंत पसरलेला हा चारपदरी पूल शहरातील वाहतुकीला गती देणारा ठरेल. या सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्व. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या स्मृतींना उजाळा दिला. ते म्हणाले, डॉ. जिचकार हे महाराष्ट्राचे एक सुंदर स्वप्न होते. त्यांचे ज्ञान, त्यांची दूरदृष्टी आणि समाजाप्रती असलेली निष्ठा आजही आपल्याला प्रेरणा देते. त्यांचे विचार हे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिशादर्शक ठरले आहेत. या उड्डाणपुलाला त्यांचे नाव देऊन, हा पूल आता ‘ज्ञानयोगी मार्ग’ म्हणून ओळखला जाणार आहे. नागपूरच्या विकासाची गाथा आता केवळ रस्ते आणि पूलांपुरती मर्यादित नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरला देशातील अव्वल शहरांपैकी एक बनवण्यासाठी अविरत प्रयत्न केले. कधीकाळी उद्योजकांना नागपूरकडे येण्यासाठी पायाभूत सुविधांचा अभाव भासायचा. पण आता परिस्थिती बदलली आहे.
Nagpur : हवालदार ते फौजदार, पोलिसांना मिळाला पदोन्नतीच्या मान
रोजगार संधींचा विस्तार
देश-विदेशातील शिष्टमंडळे येथील सुविधा पाहून थक्क होतात आणि गुंतवणुकीसाठी पुढे येतात, असे फडणवीस यांनी सांगितले. सोलर मॉड्युल निर्मितीच्या क्षेत्रात नागपूर आता देशातील सर्वात मोठे केंद्र बनत आहे. यामुळे लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. याशिवाय, शैक्षणिक सुविधा, शेती, संत्रा प्रक्रिया उद्योग आणि खनिज उद्योगांमध्येही नागपूर समतोल विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही या सोहळ्यात नागपूरच्या भविष्याची एक भव्य योजना मांडली. नागपूरमध्ये लवकरच 9 ठिकाणी भव्य व्यापारी संकुल उभारली जातील. मेडिकल चौकात दिल्लीच्या पालिका बाजारच्या धर्तीवर एक मोठे मार्केट उभे राहील, असे त्यांनी जाहीर केले. याशिवाय, 300 खेळाच्या मैदानांमुळे लाखो मुले रोज खेळतील आणि क्रीडा, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात नवे तारे उदयास येतील.
मेट्रो, इलेक्ट्रिक बस आणि 135 आसनक्षमतेच्या वातानुकूलित फ्लॉश बसेससह नागपूरच्या वाहतूक व्यवस्थेला नवे परिमाण मिळणार आहे. नागपूर हे ऑरेंज सिटी, झिरो माईल सिटीच नव्हे, तर स्पोर्ट्स सिटी म्हणूनही ओळखले जाईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही नागपूरच्या विकासातील सामाजिक समावेशकतेवर भर दिला. मोठ्या प्रकल्पांबरोबरच शहरातील लहान वस्त्यांमधील सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यासाठी 317 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असे त्यांनी सांगितले. नझूल जमिनीवरील घरांना कायदेशीर मान्यता, झुडपी जंगल क्षेत्रातील रहिवाशांना न्याय आणि भूयारी गटार योजनेचा नवीन डीपीआर यासारख्या योजनांमुळे नागपूर सर्वसमावेशक विकासाच्या मार्गावर आहे. यावेळी बावनकुळे यांनी कोराडी रोड ते भोसला मिलिट्री टीपाईंट उड्डाणपुलाची मागणी गडकरी यांच्याकडे केली, जी त्यांनी तत्काळ मान्य केली.
Gondia : पदवीधर मतदारसंघात काँग्रेस देणार भाजपच्या किल्ल्याला आव्हान
नागपूरच्या या विकासयात्रेत प्रत्येक नागरिकाला सामावून घेण्याचा हा संदेश होता. नागपूर आता केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर देशाचे एक चमकते रत्न बनत आहे.
