महाराष्ट्र

नागपूर मधील Asian Fireworks कंपनीत भयंकर स्फोट; दोघांचा मृत्यू

कडक कारवाई न झाल्यास Salil Deshmukh यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Author

नागपूरमधील एशियन फायर वर्क्स येथे झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कोतवालबड्डी शिवारात एका खासगी एक्सप्लोजिव्ह कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. राऊळगावजवळील एशियन फायर वर्क्स कंपनीमध्ये बुरुड कोळसा पावडर गरम करत असताना स्फोट झाला आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेवेळी कंपनीमध्ये 31 कर्मचारी काम करत होते, तर मिल बॉल युनिटमध्ये सात ते आठ कामगार कार्यरत होते. प्राथमिक तपासानुसार, मिल बॉल युनिटमध्ये फटाक्यांची वात तयार करताना हा स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे कंपनीत मोठे नुकसान झाले आहे.

ब्रिटिश काळात Heritage जपले, भारतीय सरकारला मात्र संवर्धन जमत नाही

परिसरातील नागरिकांचा आरोप

घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवालबड्डी भागात मोठ्या प्रमाणात स्फोटके तयार करणारे कारखाने आहेत. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना येथे घडल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी वारंवार या कारखान्यांविरोधात तक्रारी केल्या असूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. अशा घटनांमुळे परिसरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते सलिल देशमुख यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कंपन्यांना परवाने देताना सुरक्षेसाठी कडक नियम लागू केले जातात. मात्र, या नियमांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. जर हे उद्योग सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणा करत असतील, तर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कंपनीचे परवाने रद्द करण्यात यावेत आणि दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. जर प्रशासन आणि पोलीस योग्य ती कारवाई करत नसतील, तर आम्हाला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा थेट इशाराही त्यांनी दिला.

महापालिकेच्या गोंधळामुळे Aapli Bus बंद होणार

सरकारी तपासणी

दुर्घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, स्फोटाच्या कारणांचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासानुसार, ब्लोअरमध्ये स्फोट झाल्याचे आढळून आले आहे. कोळसा पावडर गरम करत असताना हा स्फोट झाल्याचे समजते.

दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार भुरा लक्ष्मण रजक (25) आणि मुनिम मडावी (28) असून, दोघेही शिवणी गावातील रहिवासी होते. जखमींपैकी सोहेल शेख आणि घनश्याम लोखंडे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृतकांच्या कुटुंबीयांना तातडीने योग्य ती आर्थिक मदत मिळावी, तसेच कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जर हा स्फोट घडला असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.

वाळू Mafia बिनधास्त, सरकारचा नाकर्तेपणा

उपाययोजना आवश्यक

झालेल्या स्फोटामुळे नागपूर परिसरातील औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर इशारा मानला जात आहे. गेल्या काही वर्षांत अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्वरित तपासणी करून आवश्यक ती पावले उचलावीत. कामगार सुरक्षेसाठी योग्य ती नियमावली तयार करून तिची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी कठोर धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

मात्र या घटनेनंतर प्रशासनाने लवकरात लवकर दोषींवर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!