नागपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच 4 सप्टेंबर रोजी नागपूरच्या एका सोलर कंपनीत पुन्हा एक भयंकर ब्लास्ट झाला आहे.
महाराष्ट्र मध्ये गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः नागपूरमध्ये ब्लास्ट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी भंडारा जिल्ह्यात आयुध निर्माण फॅक्टरी मध्ये ब्लास्ट झाला होता. त्यामध्येही अनेकांना आपला जीव गमावा लागला होता. आता नुकतेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील बाजारगाव येथे गुरुवारच्या मध्यरात्री (4 सप्टेंबर रोजी) सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला.
रात्रीच्या शांततेचा भंग करणारा हा स्फोट इतका प्रचंड होता की, त्याचा आवाज दहा किलोमीटरपर्यंत दुमदुमला. कंपनीच्या इमारती कोसळल्या, मलबा राष्ट्रीय महामार्गावर पसरला आणि या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू तर 16 जण जखमी झाले. यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. गणेशोत्सवाच्या आनंदी वातावरणात ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत कामगार मयूर गणवीर यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला, तर जखमींमध्ये कैलाश आणि मनीष वर्मा यांना लोखंडी पत्र्यांमुळे पाय गमवावे लागले. स्फोटाच्या रात्री, कंपनीच्या प्रवेशद्वारावर गावकरी आणि कामगारांचे नातेवाईक जमले.
प्रशासनावर थेट निशाणा
कंपनी व्यवस्थापनाने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने संतापलेल्या जमावाने आक्रोश व्यक्त केला. स्फोटाचा आवाज ऐकून आसपासच्या गावांतील नागरिक धावपळ करत घटनास्थळी पोहोचले, पण त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. या गोंधळात काही उपद्रवींनी कंपनी परिसरात तोडफोड केली, बसच्या काचा फोडल्या आणि संगणकांचे नुकसान केले. या घटनेने परिसरात भीती आणि शोकाचे वातावरण पसरले आहे. या दुर्घटनेनंतर प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आपल्या नेहमीच्या धडाडीने पुढाकार घेतला. गुरुवारी सकाळी ते कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले आणि कंपनीच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली. कंपनीच्या मालकावर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी लावून धरली.
बच्चू कडू यांनी आपल्या आक्रमक शैलीत प्रशासनाला खडसावले, दोन दिवसांत कारवाई झाली नाही, तर पोलीस ठाणे आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला घेराव घालू असा इशारा देत त्यांनी कंपनी व्यवस्थापनाला धारेवर धरले. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण चर्चा निष्फळ ठरली. बच्चू कडू यांनी या घटनेला प्रशासनाच्या निष्क्रियतेची किनार लावली. कंपनीत वारंवार अपघात होत आहेत, कामगारांचे जीव जात आहेत, तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासन झोपा काढत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. स्फोटानंतर कंपनीच्या एचआर ऑफिस, सिक्युरिटी ऑफिस आणि मुख्य इमारतीचे मोठे नुकसान झाले.
Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सातव्या हप्त्याचा मार्ग मोकळा
स्फोट इतका जबरदस्त होता की, मलब्याचा ढिगारा थेट राष्ट्रीय महामार्गावर कोसळला. रात्री साडेबारा वाजता धुराचे लोट दिसताच सुरक्षा पथकाने सायरन वाजवून कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पण मयूर गणवीर बाहेर पडत असतानाच स्फोटात उडालेल्या दगडांच्या तडाख्यात जागीच ठार झाले. जखमींना नागपूरच्या शासकीय आणि खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले, तर काहींवर कोंढाळी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले.
