
नागपूरच्या शिक्षण क्षेत्रात झालेल्या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाला धक्का बसला आहे. यातच आता शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षकांच्या भरतीचा नवा तपशील उघड झाला आहे.
विदर्भात शिक्षणाचे केंद्रस्थान असलेल्या नागपुरात मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्ह्यातील अनेक खासगी प्राथमिक शाळांमध्ये तब्बल 580 बनावट शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाल्याचे समोर आले आहे. या घोटाळ्यामुळे संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली असून प्रशासनाची झोप उडाली आहे. रोज नवनवीन माहिती या घटनेत उघडकीस येत आहे. सध्या यात शालार्थ आयडी चर्चेचा विषय ठरली आहे.

शिक्षक भरतीत संबंधित कर्मचाऱ्यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून शाळांमध्ये नियुक्त्या मिळवल्या. घोटाळ्याचा हा प्रकार इतका गूढरम्य पद्धतीने पार पडला की सरकारी यंत्रणांना याचा सुगावा लागेपर्यंत कोट्यवधी रुपयांचे वेतन या बोगस कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले. घोटाळ्याचे केंद्रबिंदू ठरले आहे शालार्थ आयडी जे शिक्षक व कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्याची सरकारी प्रणाली आहे. सध्या या प्रकरणात विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना अटक करण्यात आली आहे.
पासवर्डचा गैरवापर
नरड यांच्यावर मुख्याध्यापक पदासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे मंजुरी दिल्याचा आरोप आहे. नरड यांच्याच अधिकारात शालार्थ आयडी तयार करण्याचा पासवर्ड असताना, त्यांच्या नावाने कुणीतरी हा पासवर्ड गैरवापरून बनावट आयडी तयार केल्याची तक्रार झाली आहे. विशेष बाब म्हणजे ही तक्रार त्यांच्या अटकेपूर्वीच दाखल करण्यात आली होती, ज्यामुळे प्रकरणाला आणखीनच गंभीर वळण मिळाले आहे. उल्हास नरड यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, अटक ही बेकायदेशीर असून त्यांना राजकीय हेतूंनी लक्ष्य केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
नरड यांच्या वकिलाच्या म्हणण्यानुसार, प्रक्रियात्मक त्रुटी केल्या गेल्या आहेत. अधिकारी म्हणून बदनामी करण्याचा कट रचण्यात आला आहे. कोर्टाने सध्या नरड यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याचिकेवर पुढील सुनावणीपूर्वी तपास अधिकाऱ्याचा अभिप्राय मागवण्यात आला आहे. या घोटाळ्यामुळे शिक्षण क्षेत्राची प्रतिमा पूर्णतः मलीन झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची गंभीर दखल घेत तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
Amravati : आकाशात उडाले स्वप्नांचे विमान, बळीराजाला कोट्यवधींचे अनुदान
कागदपत्रांची तपासणी सुरू
शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहेत. सर्व संबंधित कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. या बनावट भरती घोटाळ्यामुळे राज्याच्या तिजोरीवर कोट्यवधी रुपयांचा आर्थिक बोजा पडला आहे. हा प्रकार कशा पद्धतीने इतक्या काळ चालू राहिला, यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. नागरिक आणि पालकवर्गामध्ये संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची मागणी केली जात आहे.