स्वच्छ भारत अभियान 2025 अंतर्गत नागपूर शहराने मोठी झेप घेतली आहे. महापालिकेच्या आक्षेपांनंतर केंद्र सरकारने रँकिंगचे पुनर्मूल्यांकन करून नागपूरच्या कामगिरीची दखल घेतली आहे.
स्वच्छतेचा मार्ग सोपा नसतो, पण संकल्प असला की, शहराचं भविष्य उजळू शकतं. नागपूरने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. स्वच्छ भारत अभियान 2025 अंतर्गत नुकत्याच जाहीर झालेल्या स्वच्छता रँकिंगमध्ये नागपूर शहराने आपली कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारली असून थेट सत्तावीसव्या क्रमांकावरून बावीसव्या स्थानावर झेप घेतली आहे. ही झेप म्हणजे केवळ एक क्रमांक वाढलेली यादी नाही, तर महापालिकेच्या नियोजन, मेहनत आणि नागरी सहभागाची मिळालेली मान्यता आहे.
17 जुलै 2025 रोजी जाहीर झालेल्या प्राथमिक अहवालात नागपूर शहराला देशभरातील 10 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये सत्तावीसवे स्थान देण्यात आले होते. या रँकिंगविरोधात नागपूर महानगरपालिकेने जोरदार आक्षेप घेतला होता. मनपाच्या म्हणण्यानुसार या रँकिंगमध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटक, जसे की तांत्रिक नवोन्मेष, नागरी सहभाग, विविध प्रभागांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष स्थिती, यांचा पुरेसा विचार करण्यात आलेला नव्हता. या मुद्द्यांचा सविस्तर पुरावा सादर करत मनपाने केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाकडे फेरतपासणीची मागणी केली होती.
प्रत्यक्ष कामगिरीला न्याय
या मागणीनंतर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेचे पुनरावलोकन केले आणि त्यानंतर नागपूर शहराची रँक थेट 22A वर नेण्यात आली. ही सुधारणा म्हणजे महापालिकेच्या नेमकेपणाने केलेल्या आक्षेपांची दखल घेतली गेली आणि त्यानंतर नागपूरच्या प्रत्यक्ष कामगिरीला न्याय मिळाला.
स्वच्छ सर्वेक्षणातील उपश्रेणींमध्येही नागपूरने उल्लेखनीय यश मिळवलं आहे. घराघरात कचरा संकलनासाठी शहराला तब्बल 90 टक्के गुण प्राप्त झाले आहेत, जे पूर्वी फक्त ३० टक्के होते. त्याचप्रमाणे कचरा वर्गीकरणासाठी एक टक्क्यांवरून आता ६० टक्के गुण देण्यात आले आहेत. नागपूरला यंदा GFC स्टार रेटिंगमध्ये 1 स्टार देण्यात आला आहे, तसेच ODF (Open Defecation Free) ‘वॉटर प्लस’ प्रमाणपत्रही प्राप्त झाले आहे.
राज्यात झळकू लागले
‘स्वच्छ सर्वेक्षण 2024-25’ वर्षाच्या सुधारित निकालानुसार, देशभरातील 40 मोठ्या शहरांमध्ये नागपूरने 22A क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातील 414 शहरी स्थानिक संस्थांमध्ये नागपूरला 25A रँक मिळाली आहे. या क्रमांकांमुळे नागपूर राज्यातही झळकू लागलं आहे.
या यशामागे गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेकडून राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा मोठा वाटा आहे. ‘स्वच्छता ही सेवा’, ‘बॅकलेन स्वच्छता मोहिम’, C&D वेस्ट मॅनेजमेंट, कंप्रेस्ड बायो गॅस प्रकल्प, बायोमाइनिंग प्रकल्प अशा नावीन्यपूर्ण योजनांमुळे शहरात केवळ शहरी सौंदर्यच वाढलं नाही, तर पर्यावरणपूरक कामांमध्येही मोठी भर पडली. त्याचबरोबर, नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी मोहिमा, जनजागृती, शाळा-विद्यार्थ्यांची जोडणी आणि स्थानिक संघटनांची साथ या साऱ्यांचा मोठा फायदा झाला.
बदल आला घडून
महापालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी या यशाचं श्रेय संपूर्ण नागपूरकर जनतेला दिलं. त्यांनी स्पष्ट केलं की, स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याचे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत आणि त्यातूनच आजचा हा बदल घडून आला आहे. केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या एका अहवालात नागपूरच्या स्वच्छता कार्यप्रणाली व सहभागी उपक्रमांची विशेष प्रशंसा केली आहे.
विशेषतः शहरातील कचरा व्यवस्थापन आणि जनतेच्या सक्रीय सहभागामुळे नागपूरचा आदर्श देशभरात इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. आज नागपूर हे फक्त ऑरेंज सिटी म्हणून नव्हे, तर ‘स्वच्छतेचं प्रतीक’ म्हणूनही ओळखलं जात आहे. रँकिंगमध्ये झालेली ही झेप म्हणजे शहराच्या स्वच्छतेतील नवचैतन्याचा ठसा आहे आणि या यशामागे नागपूरकरांच्या ‘स्वच्छतेच्या संस्कृती’ची मोठी ताकद लपलेली आहे.