महाराष्ट्र

Vidarbha : मनपाचे आर्थिक शिस्तीचे बजेट

Nagpur Municipal Corporation : आर्थिक स्थिरतेसाठी भक्कम पाऊल

Author

नागपूर महानगरपालिकेने नवीन आर्थिक वर्षासाठी संतुलित बजेट सादर केले आहे. करवाढ न करता उत्पन्नवाढीवर भर दिला आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी 5 हजार 438.61 कोटी रुपयांचे प्रस्तावित बजेट सादर केले आहे. या बजेटमध्ये 698 कोटी रुपयांचा ओपनिंग बॅलन्स राखण्यात आला असून, 39 कोटी रुपयांचा क्लोजिंग बॅलन्स प्रस्तावित आहे. मनपाने आगामी आर्थिक वर्षात 4 हजार 739.74 कोटी रुपयांचे अपेक्षित उत्पन्न गृहीत धरले असून, 5 हजार 399.05 कोटी रुपयांच्या खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.

आयुक्तांनी आर्थिक वर्ष 2024-25 चे सुधारित बजेट देखील सादर केले आहे. या सुधारित बजेटमध्ये प्रस्तावित खर्चात काही प्रमाणात कपात करण्यात आली असून, आर्थिक वर्षाच्या अखेरीस तिजोरीतील शिल्लक रकमेचा विचार करून अंदाजपत्रकात बदल करण्यात आले आहेत. मनपाने उत्पन्न वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्यावर भर दिला आहे.

Chitra Wagh : मातांसाठी पोषणावर काटकसर नको 

उत्पन्न वाढीस प्राधान्य

यंदाच्या बजेटमध्ये शहरवासीयांवर कराचा अतिरिक्त भार टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, प्रशासक राजवटीतही मनपाच्या उत्पन्नाच्या मर्यादा कायम राहिल्या आहेत. त्यामुळे, आधीपासून अस्तित्वात असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतांना अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी मनपाच्या उत्पन्न देणाऱ्या विभागांचे महसूल लक्ष्य वाढवण्यात आले आहे. आयुक्तांनी मनपाच्या थकबाकी वसुलीसाठी जोर न दिला असला, तरीही संपत्ती कर सवलतींच्या योजनांचा लांब कालावधीसाठी लाभ घेणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ग्रीन बिल्डिंगसाठी अधिक कर सवलत देण्याची घोषणा करण्यात आली असून, नागपूर महानगरपालिका व्हॉट्सअ‍ॅपद्वारे नागरी सेवा पुरवण्याच्या तयारीत आहे.

मालमत्तांचे डिजिटायझेशन 

मनपाच्या मालमत्तांचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याशिवाय, मालमत्तांमधून उत्पन्न वाढवण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. प्रशासनाच्या नियोजनानुसार, शहरात 11 ठिकाणी पीपीपी मॉडेलवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. तसेच, दोन लाख नवीन झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्प आणि आयआयटीएमएस प्रकल्प या वर्षात कार्यान्वित होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक तरतुदी करण्यात आल्या आहेत.

जलपर्णीपासून हस्तकला

मनपाने जलपर्णीचा वापर करून हस्तकला निर्मिती आणि रोजगार निर्मितीचा एक अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल तसेच स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील. शहरातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची योजना आखण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मोठा निर्णय असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी मनपाने हा पुढाकार घेतला आहे. आयुक्तांनी आपल्या बजेटमध्ये मनपाच्या अधीन असलेल्या सर्व कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. उत्पन्नवाढीवर भर देत, कर न वाढवता नागपूरकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या आर्थिक शिस्तीचा आणि नियोजनाचा हा सकारात्मक टप्पा ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!