
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात चालविलेल्या ऑपरेशन सिंदूरला काँग्रेसकडूनही समर्थन मिळाले आहे. राजकीय पातळीवर याचे प्रतिसाद उमटत आहेत.
पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संतापाची लाट उसळली होती. पाकिस्तानला आता धडा शिकवायलाच हवा अशी मागणी देशभरात जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उच्चस्तरीय बैठक घेतल्या जात होत्या, आणि काहीतरी मोठं घडणार याची चाहूल लागली होती. ती वेळ अखेर आली. भारताने ऑपरेशन सिन्दूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POJK) दहशतवादी तळांवर थेट हल्ला करत भल्या भल्या आतंकवादी गटांचे पायच उपसले.
7 मे रोजी मध्यरात्री, भारतीय वायुदल, लष्कर आणि नौदल यांच्या संयुक्त कारवाईने तब्बल 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करत सुमारे 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक इतकीच ही कारवाई मर्यादित नव्हती. ही होती भारताची धडाकेबाज आणि तितकीच धोरणात्मक प्रतिक्रिया जी स्पष्ट सांगते, आता भारत सहन करणार नाही, प्रत्युत्तर देणार. नागपूरचे काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनीही या कारवाईचं प्रांजळ स्वागत केलं आहे. ही केवळ बदला घेण्याची कारवाई नाही.

Sunil Mendhe : अवकाळी पावसात घुटमळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुढाकार
सेनेच्या शौर्याचं गौरव
भारताने दिलेला हा करारा जवाब आहे. जो दहशतवादाला कायमचा धडा शिकवण्याचं काम करतो, असं त्यांनी म्हटलं. वंजारी यांनी या संयुक्त कारवाईबद्दल तीनही दलांचं विशेष अभिनंदन केलं आहे. या कारवाईमुळे देशवासीयांचा सैन्यावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. देशाच्या सन्मानासाठी, सुरक्षिततेसाठी आणि शांततेसाठी तुम्ही दिलेलं योगदान अमूल्य आहे, असं वंजारी यांनी म्हटलं आहे. त्यांनी तीनही सैन्यदलांचं मन:पूर्वक अभिनंदन केलं. देशभरातून भारतीय सेनेच्या या शौर्याचं कौतुक केलं जात आहे.
भारत माता की जय, जय हिंद अशा घोषणांनी सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी देशभक्तीचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. विशेष म्हणजे या कारवाईला विरोधी पक्षांचाही पाठिंबा मिळाला आहे. यावरून भारताच्या सुरक्षा धोरणावर देश एकवटल्याचं चित्र दिसून येतं. भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या 9 ठिकाणांना लक्ष्य करत रात्री अचूक हल्ले केले. या कारवाईने भारताचा नवा धोरणात्मक दृष्टिकोन समोर आला आहे. देशाच्या शांततेसाठी भारत आता केवळ रक्षणच करत नाही, तर आवश्यक असेल तेव्हा निर्णायक पावलेही उचलतो. तुम्ही जर आमच्या नागरिकांवर हात उगाराल, तर भारत प्रत्युत्तर द्यायलाही मागे हटणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पाकिस्तानला मिळाला आहे.