महाराष्ट्र

Nagpur : मनपा निवडणुकीचा मसुदा अखेर जाहीर

Corporation Election : नव्या आराखड्याने वाढवली उत्कंठा

Post View : 53

Author

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी प्रभाग रचनेचा नवा मसुदा अखेर जाहीर झाला आहे. मध्यरात्री प्रसिद्ध झालेल्या या मसुद्यात 38 प्रभागांची रचना निश्चित करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या 2025 मधील निवडणुकींसाठी शहरवासीयांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. नगर रचना विभागाने प्रभाग रचनेचा नवा मसुदा मध्यरात्री जाहीर करताच नागपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेची नवी लाट उसळली आहे. 2017 आराखड्याचा धागा पकडत या मसुद्यात जवळजवळ त्याच स्वरूपाला अनुसरून नवे आराखडे सादर करण्यात आले आहेत. एकूण 38 प्रभागांची घोषणा झाली आहे. त्यात 37 प्रभागांत प्रत्येकी चार वॉर्डांचा समावेश आहे, तर प्रभाग क्रमांक 38 मध्ये यावेळीदेखील तीनच वॉर्ड राहणार आहेत.

मसुद्याची घोषणा प्रत्यक्षात मागील शुक्रवार नियोजित होती. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ती पुढे ढकलावी लागली. अखेर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी पूर्वसूचना देत 23 ऑगस्टला मसुदा जाहीर होईल असे सांगितले. मध्यरात्री 12 वाजता आराखड्याचा पडदा उघडण्यात आला. या घोषणेनंतर नागरिक, जनप्रतिनिधी आणि इच्छुक उमेदवारांसाठी हरकती आणि सूचना नोंदविण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरु झाली आहे.

Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी बैलपोळ्याच्या दिवशी उभा आशेचा दीप

पुढील राजकीय समीकरणे

नवीन मसुदा रचनेत कोणतेही मोठे बदल दिसून आले नाहीत. 2017 मध्ये आखलेला आराखडा जशाचा तसा ठेवत चार वॉर्डांचा एक प्रभाग हीच पद्धत कायम ठेवली आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 37 मध्ये चार-चार वॉर्ड असून प्रभाग क्रमांक 38 हा पूर्वीप्रमाणे तीन वॉर्डांचा राहील. मात्र यावेळी मतदारसंख्या वाढल्याचे स्पष्ट दिसून येते. प्रभाग क्रमांक 16 मध्ये तब्बल 71 हजार 187 मतदारांची नोंद आहे, तर प्रभाग क्रमांक 38 मध्ये केवळ 47 हजार 216 मतदारांची उपस्थिती आहे. या आकडेवारीमुळे राजकीय पक्षांचे गणित निश्चितच बदलणार आहे.

मसुद्यावर आता नागरिक आणि नेत्यांना आपली मते मांडण्याची संधी मिळाली आहे. 28 ऑगस्टपर्यंत हरकती आणि सूचना नोंदविता येतील. त्यानंतर नगर विकास विभाग 8 सप्टेंबरपर्यंत सर्व हरकतींचे परीक्षण करून अंतिम मसुदा राज्य सरकारकडे पाठवेल. 26 सप्टेंबरपर्यंत हा अंतिम आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे सुपूर्त केला जाईल. आयोग 6 ऑक्टोबर रोजी अधिसूचना काढत अंतिम प्रभाग रचना जाहीर करेल.

MoRTH Rules : गाडी जुनी झाली तर फी नवी झाली, सरकारचा भन्नाट फंडा

नागपूरमधील राजकीय वातावरण या मसुद्यामुळे आणखी तापले आहे. प्रत्येक प्रभागातील मतदारसंख्या, भौगोलिक रचना आणि वॉर्डांचे संयोजन हे आगामी निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, काही प्रभाग वगळता स्वरूप जवळजवळ पूर्ववत असल्याने विद्यमान नेत्यांच्या योजना जवळपास निश्चित राहतील, परंतु मतदारसंख्येतील वाढ आगामी रणधुमाळीला नवे वळण देऊ शकते. शहरातील प्रत्येक राजकीय पक्ष या मसुद्यावर आपली रणनीती आखण्यासाठी सज्ज होत आहे. पुढील काही दिवसांत नागपूरच्या राजकीय चर्चांचा सूर या मसुद्यावर केंद्रित राहणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!