
नागपूर पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा मोठा जाळा उधळून लावला आहे. मुंबई-भंडारा ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश करत पोलिसांनी ऑपरेशन थंडर अंतर्गत कठोर कारवाई केली आहे.
नागपूर पोलिसांची अमली पदार्थविरोधी लढाई पुन्हा एकदा जोरात सुरू झाली आहे. बदलत्या तस्करीच्या पद्धती आणि वाढती मागणी यामुळे शहरात आणि परिसरात ड्रग्जसंबंधित गुन्हेगारी क्रियाकलापांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमली पदार्थ विरोधी पथकाच्या माध्यमातून ऑपरेशन थंडर नावाची विशेष मोहीम राबवली आहे. गेल्या काही दिवसांत या मोहीमेअंतर्गत नागपूरमध्ये धक्कादायक कारवाई झाली आहे. गुन्हे शाखेने ४२ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करत, 3 लाखांहून अधिक रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक केली गेली आहे.
मुंबईपासून भंडारापर्यंत पसरलेल्या ड्रग्ज नेटवर्कचा मोठा पर्दाफाश झाला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे 1 जून रोजी (रविवारी) दुपारी 12.15 ते 3 वाजेपर्यंत गणेशपेठ येथील बस स्टँड रोडवर सापळा रचण्यात आला. एका संशयित तरुणाला मोपेडसह थांबवले गेले. त्याच्यासोबत असलेल्या पार्सलमधून 42 ग्रॅम मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अर्पण मनीष गोस्वामी (28) असून तो भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याच्याजवळील अंदाजे 3 लाख 600 रुपयांचा मोपेडही जप्त करण्यात आला आहे, जो ड्रग्ज वाहतूक करण्यासाठी वापरला जात होता.

Rahul Gandhi : ट्रम्पच्या फोननंतर मोदींनी युद्धबंदी स्वीकारली
कठोर कारवाई गरजेची
तपासादरम्यान अर्पणने कबूल केले की, हा मेफेड्रोन मुंबईहून आणला गेला असून तो भंडारा येथे किरकोळ विक्रीसाठी वितरित केला जात होता. त्याने आपल्या इतर तीन साथीदारांची नावेही सांगितली. खैबर जाफरी, शादाब पठाण आणि साद जामा, जे भंडारा येथील फुले कॉलनी, राष्ट्रीय महामार्ग रोड परिसरातील रहिवासी आहेत. या सर्वांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी अर्पणला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आणि सहआयुक्त एन.डी. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईमुळे स्पष्ट झाले आहे की सिंथेटिक ड्रग्जचा तस्करीचा जाळा आता फक्त महानगरांपुरता मर्यादित नाही, तर तो लहान शहरांमध्येही सुळसुळाट करत आहे. यामुळे ड्रग्जविरोधात समन्वित आणि कठोर कारवाई करणे गरजेचे ठरले आहे. भंडारा पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी सांगितले की, भंडारा पोलिसांनी या संशयित आरोपींच्या वर्तुळाचा यापूर्वीही शोध घेतला होता. त्यांनी स्पष्ट केले की, ड्रग्ज तस्करी किंवा वापर कोणत्याही परिस्थितीत सहन होणार नाही. पोलिस प्रशासन शून्य सहनशीलतेच्या धोरणानुसार कारवाई करत आहे. नागपूर आणि भंडारा परिसरात वाढत असलेल्या ड्रग्ज तस्करीच्या जाळ्यावर नजर ठेवून, पोलिस विभाग या गंभीर समस्येवर धडक कारवाई करत आहे.