नागपूरमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाला ड्रग्ज तस्करी करताना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईने शहरात मोठी खळबळ उडाली असून तब्बल 18 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नागपूर शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या छायेखाली आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकाचा मुलगा एमडी अमली पदार्थांची तस्करी करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या धडक कारवाईने नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकेकाळी क्रीडा क्षेत्रात चमकणाऱ्या बॉडी बिल्डरच्या आयुष्याला आता काळा डाग लागला आहे.
गणेशपेठ पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये माजी नगरसेवक अजय बुग्गेवार यांचा सुपुत्र संकेत बुग्गेवार एमडीसह ताब्यात घेतला आहे. त्याच्याकडून 16.07 ग्रॅम एमडी पावडर हस्तगत करण्यात आली आहे. याची बाजारमूल्य जवळपास 1.67 लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 18.17 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या कारवाईने नागपूर गुन्हेगारी विश्वाला हादरून सोडले आहे.
Vijay Wadettiwar : पुरोगामी आवाज दाबण्यासाठी भाजपकडून पूर्व नियोजित हल्ला
यशस्वी टप्प्याला गवसणी
नागपूर पोलिस आयुक्तालयाने अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत ‘ऑपरेशन थंडर’ हाती घेतले आहे. आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर या मोहिमेने वेग घेतला आहे. शहरातील अंमली पदार्थांच्या पुरवठ्यावर जबरदस्त कारवाई केली जात आहे. संकेत बुग्गेवारवर टाकलेल्या या छाप्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की आरोपी संकेत बुग्गेवार मध्यवर्ती बसस्थानकाजवळील हेडाऊ रेस्टॉरंट परिसरात अमली पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी रात्रीपासूनच परिसरात पाळत ठेवली. त्यानंतर सापळा रचून कारवाई केली. जाधव चौक परिसरात आरोपी आपल्या एमएच 45 एव्ही 4554 क्रमांकाच्या वाहनातून दाखल होताच पोलिसांनी ताबडतोब त्याला थांबवून कसून तपासणी केली.
संकेत बुग्गेवार हा बॉडी बिल्डर आणि जिम ट्रेनर म्हणून नागपूरमध्ये परिचित होता. नोव्हेंबर 2022 मध्ये दिल्ली येथे पार पडलेल्या बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले होते. मिस्टर इंडिया हा प्रतिष्ठेचा किताबही त्याने मिळवला होता. मात्र या चकाकत्या क्रीडा प्रवासाच्या आडून सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या जाळ्याचा पर्दाफाश झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. गणेशपेठ पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीकडून मिळालेल्या पावडरची बाजारमूल्य 1.67 लाख रुपये असून एकूण मुद्देमाल 18.17 लाख रुपये इतका जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मोबाईल फोन, कार आणि रोकड यांचाही समावेश आहे. पोलिस विभागाकडून आरोपीची सखोल चौकशी केली जात आहे. तसेच ड्रग्ज नेटवर्कच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Buldhana : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘शिंदेंनी’ आणला भूकंप
ड्रग्ज मुक्तीच्या दिशेने
नागपूर शहराला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार मोहिम सुरु आहे. ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत नागपूर पोलिसांनी मागील काही दिवसांपासून सातत्याने मोठमोठ्या कारवाया करत अनेक अंमली पदार्थाच्या विक्रेत्यांना तुरुंगात ढकलले आहे. या कारवाईमुळे नागपूरमधील गुन्हेगारीला लगाम घालण्याचा प्रयत्न जोरात सुरु आहे. या प्रकरणामुळे नागपूरच्या राजकारणात मोठा भूकंप आला असून जनतेमध्येही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिसांनी उचललेले पाऊल हे नागपूरच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. या मोहिमेच्या यशामुळे नागपूर शहरात अमली पदार्थांचा कॅन्सर थांबवण्यास हातभार लागणार आहे.