नागपूर मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याने अधिकाऱ्यांच्या छळाखाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नागपूर महानगर पालिकेच्या ढिसाळ कारभारावर रोष ओसंडून वाहत असताना गुरुवारी (7 ऑगस्ट रोजी) आसीनगर झोनमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. सफाई कर्मचारी राजू उपाध्याय यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी मृतदेह थेट झोन कार्यालयासमोर ठेवून तीव्र आंदोलन छेडले. गंभीर आरोप, भावनिक घोषणाबाजी आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवणारे हे आंदोलन पाहून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मृतदेहासमोर महानगरपालिका मुर्दाबादच्या घोषणांनी हवेत संतापाचा जणू ज्वालामुखीच उसळला.
राजू उपाध्याय यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये थेट भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे नमूद केली आहेत. यात गुड्डू राऊत आणि योगेश हाथीपछेल यांच्यावर छळ, दबाव आणि अन्याय केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. कुटुंबाचा आरोप आहे की, या अधिकाऱ्यांच्या छळामुळेच राजूंनी हा टोकाचा पाऊल उचलला. काही दिवसांपूर्वी सफाई करताना जड चेंबरचं झाकण पायावर पडल्याने राजू जखमी झाले होते. उपचारासाठी सुट्टी मागूनही ती नाकारण्यात आली आणि जखमी अवस्थेतच काम करण्यास भाग पाडण्यात आले. अपमानास्पद भाषेत बोलणे, बदली करून त्रास देणे आणि एकट्याच्यावर प्रचंड कामाचा ताण टाकणे या सर्वामुळे मानसिक तणाव वाढत गेला.
दोषींवर त्वरित कारवाई
नातेवाइकांनी स्पष्ट सांगितले की, हे प्रकरण आत्महत्येचे सून खुनाचे आहे. त्यांना जाणीवपूर्वक आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले, असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला. राजूंवर असह्य कामाचा ताण टाकून, सुट्ट्या नाकारून आणि सतत अपमान करून त्यांना मानसिकदृष्ट्या खच्चीकरण करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी सुसाइड नोट लिहून त्यांनी दोषींना उघड केले. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.गुरुवारी दुपारी आसीनगर झोन कार्यालय समोरचा नजारा हृदय पिळवटून टाकणारा होता. राजू उपाध्याय यांचा मृतदेह, त्याभोवती रडणारे कुटुंबीय, संतप्त आंदोलक आणि घोषणांचा कडकडाट.
कुटुंबाने मृतदेहासमोरच धरणे धरून स्पष्ट इशारा दिला की, न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील. सामाजिक कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेत महानगरपालिका मुर्दाबादच्या घोषणा देत त्वरित कारवाईची मागणी केली. दोषींना निलंबित करून गुन्हा दाखल न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलकांचा ठाम पवित्रा कायम राहिला. दोषींना कारवाई शिवाय मृतदेह उचलला जाणार नाही, हा संदेश आंदोलकांनी वारंवार दिला. परिणामी, झोन कार्यालय परिसरात वाहतुकीवरही परिणाम झाला आणि महापालिका प्रशासनावर दबाव वाढत गेला.
Chandrapur : देवा भाऊंनी सांगितले ऑपरेशन, शोधून आणले अनेक जण
संपूर्ण घटनेने केवळ मनपाच्या हलगर्जीपणाचे नाही तर कामगारांवरील अन्यायाचे चित्रही स्पष्ट केले आहे. मृतदेह झोन ऑफिसपुढे ठेवून केलेला हा आंदोलनाचा प्रकार नागपूरच्या नागरी हक्क संघर्षाच्या इतिहासात ठसठशीत नोंदवला जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.