महापालिकेच्या निधीचा कार्यक्षमतेने उपयोग करून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेत विकासकामांसाठी ई-निविदा प्रक्रियेचा निर्णय घेतला गेल्यानंतर अनेक वादळं निर्माण झाली आहेत. आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे. महापालिकेची आर्थिक बचत आणि पारदर्शकता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मात्र, या निर्णयामुळे काही ठिकाणी राजकीय तसेच कंत्राटदारांच्या गटांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचं दिसत आहे.
महापालिकेच्या निधीचा कार्यक्षमतेने उपयोग करून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी ई-निविदा प्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन लाखांपर्यंतच्या कामांसाठी ऑफलाइन निविदा प्रक्रिया, तर त्याहून अधिक रकमेच्या कामांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेच्या माध्यमातून पारदर्शकता वाढून कंत्राटदारांमध्ये स्पर्धा निर्माण होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार दहा लाखांपर्यंतच्या कामांसाठी ऑफलाइन निविदा प्रक्रिया केली जाते; मात्र त्यात केवळ 4 ते 5 टक्क्यांची बचत होते, तर ई-निविदांमध्ये 20 ते 30 टक्क्यांची बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रियेमुळे महापालिका व राज्य सरकारला आर्थिक तोटा होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विभागणीची भीती
ई-निविदा प्रक्रियेमुळे मोठ्या कंत्राटदारांना फायदा होईल. मात्र लहान कंत्राटदारांवर अन्याय होईल, असा आरोप काही गटांनी केला आहे. मोठ्या रकमेच्या कामांची विभागणी केल्यास स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेचा उद्देश अपूर्ण राहील, अशी भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. या भीतीला गांभीर्याने घेत महापालिका आयुक्तांनी कंत्राटांची विभागणी होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
याशिवाय, लहान गटांचे प्रतिनिधी आणि काही राजकीय नेत्यांनी ई-निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. यामध्ये तांत्रिक अडचणी, माहितीच्या अभावामुळे प्रक्रिया अपूर्ण राहण्याचा धोका आहे. लहान कंत्राटदारांचे नुकसान होण्याची शक्यता यांसारख्या मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
महापालिकेचा षडयंत्र की विरोधकांचा डाव?
ई-निविदा प्रक्रियेचा उद्देश आर्थिक बचतीसाठी सकारात्मक असला तरी त्यामागील राजकीय हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. काही जणांचा असा आरोप आहे की, मोठ्या रकमेची कामं ठरावीक गटांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.