महाराष्ट्र

Nagpur Roads : आता पावसाचे पाणी रस्ते जिरवणार जमिनीत

Nagpur Municipal Corporation : नागपूरच्या विकासाला अभिजीत चौधरींचा सस्टेनेबल टच

Author

नागपूर महानगरपालिकेने ऐतिहासिक पाऊल उचलत सिमेंट रस्त्यांसोबतच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणालीचा समावेश करून पर्यावरणपूरक विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या दूरदृष्टीमुळे शहराच्या भूजल पातळीला चालना मिळणार आहे.नागपूरचा विकास आणखी शाश्वत आणि स्मार्ट होणार आहे.

नागपूर महानगरपालिकेने आणखी एक ऐतिहासिक पाऊल उचलत राज्यातील पहिली अशी महानगरपालिका होण्याचा मान मिळवला आहे, जी सिमेंट रस्त्यांसोबत रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लागू करत आहे. आतापर्यंत शहरातील सिमेंट रस्त्यांमुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास अडथळा येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत होते. मात्र, आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करत, महापालिकेने पर्यावरणपूरक पायाभूत विकासाचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या दूरदृष्टीतून हा निर्णय घेण्यात आला असून, शहरातील 260 कोटी रुपयांच्या चौथ्या टप्प्यातील सिमेंट रस्त्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली लागू केली जाणार आहे. ही प्रणाली केवळ पाणी संवर्धनाचाच उद्देश साधणार नाही, तर शहराच्या भूजल पातळीत वाढ होऊन पाण्याची टंचाई कमी करण्यास मदत करेल. यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य वापर होईल आणि नाल्यांमध्ये वाहून जाणारे कोट्यवधी लिटर पाणी आता साठवले जाईल.

Devendra Fadanvis : खेळाच्या मैदानावरही देवा भाऊंची तुफान फटकेबाजी

सिमेंट रस्त्यांसोबत जलसंवर्धन

शहराच्या सर्वांगीण विकासात महापालिका आक्रमक पावले टाकत आहे. 9 ते 24 मीटर रुंदी असलेल्या 33 प्रमुख रस्त्यांचा समावेश असलेल्या या प्रकल्पात पायाभूत सुविधा विकसित करताना जलसंवर्धनालाही तितकाच प्राधान्य देण्यात आले आहे. सिमेंट रस्त्यांच्या पहिल्या तीन टप्प्यांमध्ये 1 हजार 550 किमी पैकी 690 किमी सिमेंट रस्ते बांधण्यात आले. मात्र, या टप्प्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली नव्हती. आता हा मोठा बदल घडवून आणण्यात आला असून, या प्रणालीमुळे रस्त्यांचे आयुष्यही वाढणार आहे. हे संपूर्ण काम 14 पॅकेजेसमध्ये विभागले असून प्रत्येक झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणुकीच्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. शहरात पूरस्थिती टाळण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी या निर्णयाची मोठी भूमिका राहणार आहे.

झोननिहाय प्रगती

महापालिकेने शहरातील विविध झोनमध्ये सिमेंट रस्त्यांच्या कामांना वेग दिला आहे. लक्ष्मीनगर झोनमध्ये सोमलवाडा रोड, गोविंदनगर आणि वर्धा रोडवरील ७०-८० टक्के काम पूर्ण झाले असून, लवकरच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि वृक्षारोपणाची कामे सुरू होणार आहेत. धरमपेठ झोनमधील गांधीनगर चौक ते श्रद्धानंदपेठ चौक आणि छत्रपतीनगर ते वर्धा रोड ही ५०टक्के कामे पूर्ण झाली आहेत. धंतोली झोनमध्ये भारत पेट्रोल पंप ते मानवता हायस्कूल या रस्त्याचे ५०टक्के काम झाले असले तरी, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम अद्याप सुरू व्हायचे आहे. नेहरुनगर झोनमध्ये सेंट्रल ॲव्हेन्यू ते भावसार चौक हा रस्ता ५०टक्के पूर्ण झाला असून, येथे वृक्षारोपण आणि सांडपाणी वाहिन्यांचे काम सुरू आहे.

नागपूरचा नवा अध्याय

महापालिकेच्या या निर्णयामुळे नागपूर शहर जलसंवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वाची झेप घेत आहे. तज्ज्ञांच्या मते, शहरी भागात जलसंधारणाच्या उपाययोजना तितक्याच महत्त्वाच्या आहेत जितक्या ग्रामीण भागात. नागपूर महानगरपालिकेच्या या उपक्रमामुळे एकीकडे पाणीटंचाई कमी होणार असून, दुसरीकडे पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 मार्चनंतर हे काम युद्धपातळीवर सुरू होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे नागपूर शहर पायाभूत विकासासोबत पर्यावरणपूरक व्यवस्थापनाचा आदर्श ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!