
डॉ. अभिजित चौधरी यांच्या पाठपुराव्यानंतर पंतप्रधान ई-बस सेवा योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेला शंभरहून अधिक नवीन ई-बसेस मिळणार आहेत.
केंद्र सरकारच्या पंतप्रधान ई-बस सेवा योजनाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेला तब्बल 150 पर्यावरणपूरक ई-बस मिळणार आहेत. शहरातील सार्वजनिक वाहतुकीला नवे बळ मिळवून देणाऱ्या या निर्णयामुळे आपली बस सेवा अधिक सक्षम आणि आधुनिक होणार आहे. या योजनेनुसार नागपूरमधील 75 बस कोराडी बस डेपो मधून तर उर्वरित 75 बस खापरी डेपो येथून संचालित केल्या जाणार आहेत. या दोन्ही डेपोमध्ये चार्जिंग स्टेशन्स, मीटर रूम आणि ट्रान्सफर रूम अशा आधुनिक सुविधांची उभारणी केली जाणार आहे.
प्रकल्पाच्या तयारीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी शुक्रवारी कोराडी येथील बस डेपोची सविस्तर पाहणी केली. त्यांनी प्रस्तावित चार्जिंग स्टेशन, ट्रान्सफर रूम आणि मीटर रूमची माहिती घेतली. कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत आणि उपायुक्त व परिवहन व्यवस्थापक विनोद जाधव देखील उपस्थित होते. शहराच्या वाहतूक सेवेला नवा चेहरा देणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी नेमकी वेळेत आणि प्रभावी होणे हे महानगरपालिकेसाठी प्राथमिक उद्दिष्ट राहील.

इंधन खर्चात बचत
योजनेंतर्गत संपूर्ण देशभरात दहा हजार ई-बसेस वितरित करण्यात येणार आहेत. ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या संकल्पनेतून साकारली जात आहे. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने ही योजना राबवली आहेत. विविध राज्य सरकारांकडून प्रस्ताव मागवण्यात आले होते. डॉ. अभिजित चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाला नागपूरसाठी प्रस्ताव पाठवला होता. त्याला केंद्राची मंजुरी मिळाल्यानंतर, नागपूर महानगरपालिकेला 150 बस देण्याचा निर्णय घेण्यात आला.
नागपूरच्या प्रवाशांना यामुळे स्वच्छ, गोंगाटमुक्त आणि आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. या नव्या योजनेमुळे नागपूर शहरात एकाच वेळी दोन अत्याधुनिक ई-बस डेपो कार्यान्वित होणार आहे. आपली बस सेवेचा दर्जा अधिक उंचावणार आहे. सध्या नागपूर शहरात डिझेल आणि सीएनजी बस वापरल्या जात आहेत. मात्र ई-बस आल्याने खर्चात बचत होणार आहे. पर्यावरणालाही हातभार लागणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर नागपूर ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने एक मोठा पाऊल उचलणार आहे.