नागपूरमध्ये ऑनलाईन डिलिव्हरी ॲप्सच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख समीर शिंदे यांनी या प्रकरणावर आक्रमक आंदोलन केले आहे.
सध्या महाराष्ट्रात एकच चिंतेचा विषय चर्चेत आहे. तो म्हणजे एमडी आणि अन्य अमली पदार्थांची तस्करी. गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या कानाकोपऱ्यातून ड्रग्सची ऑनलाईन तस्करी होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. विशेषतः अल्पवयीन मुलं-मुली या जाळ्यात अडकत असल्याने समाजात चिंता वाढली आहे. पोलिसांनी काही ठिकाणी धाडसत्र राबवले, काहीजणांना अटकही झाली, पण तरीही ड्रग्स माफियांवर ठोस नियंत्रण मिळवण्यात यंत्रणांना यश आलेले दिसत नाही. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या जोरात सुरू आहे.
अधिवेशनात एक धक्कादायक बाब समोर आली. ड्रग्जची होम डिलिव्हरी. होय, फूड डिलिव्हरी ॲप्सच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी केल्या जात असल्याची माहिती विधिमंडळात मांडण्यात आली आणि एकच खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर आता नागपूर शहराचीही नोंद घेतली जात आहे. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही डिलिव्हरी ॲप्सच्या माध्यमातून अमली पदार्थांची वितरण होत असल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. या प्रकारांवर आता एकनाथ शिंदे गटाचे शहरप्रमुख समीर शिंदे यांनी थेट कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे.
बेसा आउटलेटला टाळे
शहरात वाढत्या ड्रग्सच्या घटनांवर त्यांनी आक्रमक पवित्रा घेत स्वतः आंदोलनाचे नेतृत्व केले. समीर शिंदे यांनी केलेल्या आंदोलनानंतर शहरातील एका डिलिव्हरी कंपनीच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. संबंधित ॲपच्या माध्यमातून अमली पदार्थ पोहोचवले जात असल्याचा आरोप त्यांनी लावला होता. ही बाब पोलीस यंत्रणेकडे नेण्यात आली. त्यानंतर कंपनीचे जनरल मॅनेजर स्वतः समीर शिंदे यांची भेट घेण्यासाठी आले. मात्र, समीर शिंदे यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत ड्रग्सची डिलिव्हरी सहन केली जाणार नाही असा दम भरला.
शिंदेंच्या दडपणामुळे कंपनीने बेसा परिसरातील आपले आउटलेट तात्काळ बंद केले. या घटनेनंतर नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांतून समीर शिंदेंच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. त्यांनी केवळ आंदोलन करून थांबले नाहीत. तर संबंधित ॲप्सवर अमली पदार्थ तस्करी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी ठाम मागणीही शासनाकडे केली आहे. नागपूर मध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या साखळीद्वारे एक नवाच ‘स्मार्ट’ धंदा उभा राहत आहे. मात्र, समीर शिंदे यांसारख्या स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे या रॅकेटला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. त्यांची पुढील कारवाई आणि पोलिसांची भूमिका याकडे आता संपूर्ण शहराचं लक्ष लागलं आहे.
Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी