महाराष्ट्र

Operation Thunder : गल्ल्यांतील अंधारावर खाकीचा वज्राघात

Nagpur : ड्रग्सच्या दलदलीत अडकलेल्या पिढीसाठी पोलिसांचे युद्ध सुरू

Author

(या लेखातील मतं ही लेखकाची आहेत. या मतांशी ‘द लोकहित लाईव्ह’ सहमत असेलच असे नाही).

नागपूर पोलिसांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करीवर कठोर कारवाई करून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त आणि आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत आयपीएस रश्मिता राव यांचा विशेष लेख.

नागपूर संत्री, वाघ आणि झिरो माईलसाठी ओळखले जाणारे शहर. पण या शहराच्या झोपडपट्ट्यांत, कॉलेज कॅम्पसच्या कोपऱ्यांत आणि रात्रीच्या शांत रस्त्यांवर, एक न दिसणारा शत्रू पाय रोवत चाललाय. तो म्हणजे अंमली पदार्थांचे जाळं. एरवी ‘काळ्या गल्लींची’ किंवा ‘सीमेवरील कारवायांची’ गोष्ट वाटणारा ड्रग्सचा साप नागपूरच्या अगदी मध्यभागी पोहोचला आहे. युनायटेड नेशन्सच्या चेतावणी प्रमाणे, ड्रग्स मार्केट्स आता कायद्याच्या चौकटींपेक्षा अधिक वेगाने बदलत आहेत. हे वास्तव नागपूरच्या गल्ल्यांमध्ये जिवंत होत आहे. सांस्कृतिक वारसा आणि शिक्षणाचे केंद्र असलेलं नागपूर आता अनवधानात एका ड्रग्स ट्रान्झिट हबमध्ये रूपांतरीत होतंय. मुंबई, हैदराबाद, कोलकाता यांना जोडणारे महामार्ग, स्थलांतरितांची गर्दी आणि महाविद्यालयीन तरुणांची झपाटलेली गर्दी. या सर्व गोष्टींनी शहरात ड्रग्सचा प्रवेश अधिक सोपा केला आहे.

मार्च 2024 ते जून 2025 काळातच ‘ऑपरेशन थंडर’ने 8.6 कोटींचा ड्रग्ज जप्त करत 730 जणांना अटक केली. यात केवळ पारंपरिक गांजा किंवा चरस नव्हे, तर सिंथेटिक ड्रग्स, एमडी (म्याव-म्याव), LSD ब्लॉटर्स आणि फार्मा ओपिऑइड्स सुद्धा सापडले. पैशांची देवाण-घेवाण जशी डिजिटल झाली, तशी ड्रग्सची विक्रीही इंस्टाग्राम डीएम, स्नॅपचॅट स्नॅप्स आणि डार्कनेटवर सर्रास सुरू आहे. तंत्रज्ञान म्हणजे दोनधारी तलवार, असं नेइल वुड्स या ब्रिटिश अंडरकव्हर ऑफिसरचं म्हणणं अक्षरशः सत्य ठरतंय. कायद्याचं पालन करताना एक कठीण प्रश्न वारंवार डोळ्यासमोर येतो हे तरुण गुन्हेगार आहेत की दुर्दैवी बळी? आमच्या स्टेशनच्या बाहेर हात थरथरणारे तरुण, डिटॉक्स मागणाऱ्या आईच्या हुंदक्यांनी भरलेला परिसर. एक वेदनादायी चित्र.

Shalartha Scam : ओंकार अंजीकरच्या शिक्षण रॅकेटवर एसआयटीचा घाला

आंतरराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास

जगभरातील देश जसे पोर्तुगाल, कॅनडा आणि स्वित्झर्लंड यांनी ड्रग्सच्या संकटाकडे ‘गुन्हा’ म्हणून नाही तर ‘आरोग्य समस्या’ म्हणून पाहायला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे. व्यसन हा आजार आहे, गुन्हा नव्हे. असं AIIMS डॉ. अतुल अंबेकर यांचं स्पष्ट मत आहे. आपल्या देशात NDPS कायद्याचा कलम 64A जरी उपचारासाठी संधी देत असला, तरी त्याची अंमलबजावणी अपुरीच आहे. शिक्षा आणि पुनर्वसन यांची सांगड घालणं ही आता गरज नाही, तर काळाची मागणी आहे. फक्त अटक करून, माल जप्त करून आणि कारवाई करून हे युद्ध संपणार नाही. कारण हे युद्ध फक्त रस्त्यावर नव्हे तर माणसांच्या मनात सुरू आहे. ‘ऑपरेशन थंडर’ ही केवळ कायद्याची मोहीम राहिलेली नाही, तर ती एक जनजागृतीची चळवळ बनली आहे.

शाळा आणि कॉलेजांमध्ये थेट पोलिस अधिकाऱ्यांनी जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा उपक्रम असो, की तरुणांना सकारात्मक मार्गाकडे वळवण्यासाठी घेतले जाणारे खेळांचे महोत्सव, स्पर्धा आणि चर्चासत्रं. हे सगळं या मोहिमेचा भाग आहे. यासोबतच, UNODC, आयसलँड आणि ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय अंमली पदार्थ प्रतिबंधक धोरणांवर आधारित वेबिनार्स आणि जागतिक मॉडेल्सचा अभ्यास करून नागपूर पोलिसांनी अधिक व्यापक आणि परिणामकारक रणनीती उभी केली आहे. कारण आम्हाला हे कटाक्षाने समजलंय की, आज एक इंजेक्शन घेतलं, तर उद्या एक प्रेत आणि म्हणूनच आम्ही आमची पिढी गमावू शकत नाही. युद्ध अजून संपलेलं नाही, कारण महाराष्ट्रात केवळ 2024 एका वर्षात तब्बल 4 हजार 249 कोटी रुपयांची ड्रग्स जप्त झाली.

Akola : राज राजेश्वर मंदिर श्रेयवादाच्या धुळवडीत मदन भरगडांचा बॉम्ब 

संशयास्पद हालचाली नोंदवा

सोबतच 14 हजार 230 जणांना अटक करण्यात आले. पण आकड्यांनी हे युद्ध जिंकता येत नाही. या लढ्याचं खरं शस्त्र आहे समाजाचा सक्रिय सहभाग, पालकांचा सजगपणा आणि तरुणांची मानसिक बळकटी. म्हणूनच नागपूर पोलिसांचा एक स्पष्ट आव्हान आहे, पालकांनी लाज न ठेवता आपल्या मुलांशी खुलेपणाने संवाद साधावा, शाळा आणि महाविद्यालयांनी कठोर पण सहानुभूतीपूर्ण अँटी-ड्रग्स धोरणे राबवावीत. डिजिटल प्लॅटफॉर्मवर ड्रग्सच्या विक्रीवर नजर ठेवणं हे टेक कंपन्यांचं नैतिक कर्तव्य आहे. कोणतीही संशयास्पद हालचाल दिसली तर तात्काळ 112 क्रमांकावर माहिती द्यावी. कारण या युद्धात प्रत्येक नागपूरकराचं योगदान महत्त्वाचं आहे.  आज जर आपण पाऊल उचललं नाही, तर उद्या संपूर्ण समाजाला त्याची किंमत चुकवावी लागेल. माझ्यात एक आईचं काळजीचं मन आहे. एका पोलिसाचा निर्धार आहे. नागपूर पोलिसांचं हे युद्ध फक्त कायद्याच्या चौकटीत नाही. तर आपल्या मुलांच्या भविष्याच्या रक्षणासाठी आहे.चला, नागपूर केवळ स्वच्छ नव्हे तर व्यसनमुक्त करूया.

Ritesh Tiwari : घोटाळ्याच्या ‘पाईपलाईन’मधून वाहतंय केवळ राजकीय नाटक

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!