
नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांत अमली पदार्थांच्या तस्करीत लक्षणीय वाढ झाली आहे. या धोकादायक प्रवृत्तींवर नियंत्रण आणण्यासाठी नागपूर पोलिसांनी ऑपरेशन थंडर ही विशेष मोहीम राबवली आहे. या अनुषंगाने नागपूर शहराचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचा विशेष लेख.
नागपूर शहराच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारताना, माझ्या मनात अगदी पारंपरिक भूमिका स्पष्ट होती. ती म्हणजे गुन्हेगारी रोखणे, कायदा आणि सुव्यवस्थेची राखण करणे, आणि नागरी सुरक्षेची हमी देणे. पण आयुष्य कधी कधी अशा गोष्टींचा सामना घडवतं, ज्या नुसत्याच आकडेवारीत मोजता येत नाहीत. एका दुपारी माझ्या कार्यालयात आलेली एक आई, हेच वास्तव घेऊन आली.ती एकटी होती. कंपलेल्या हातांनी, भेदरलेल्या नजरेने, पण तुटलेल्या अंतःकरणाने. तिने काही बोलायच्या आधीच तिच्या डोळ्यांतून सांडणारे अश्रू अनेक कथा सांगून गेल्या.
‘सर, माझा मुलगा सोळा वर्षांचा आहे. तो ड्रग्जच्या आहारी गेला आहे. हिंसक झाला आहे. माझ्यावर हात उचलतो, चोरी करतो. तुम्ही शेवटची आशा आहात.’ या एका वाक्याने माझा दृष्टिकोन पूर्णतः बदलून टाकला. ही आई एकटी नव्हती. अशा असंख्य माता-वडिलांचे आयुष्य ड्रग्जच्या सावटाने उद्ध्वस्त झाले आहे. घरं तुटली आहेत, स्वप्नं विखुरली आहेत. या अंधारावर प्रकाश टाकण्यासाठी आणि समाजाला एक नवी दिशा देण्यासाठी, ऑपरेशन थंडर या मोहिमेची सुरुवात झाली. ही मोहीम केवळ छाप्यांची साखळी नव्हती. ती एक जागृती होती, एक एल्गार होता.

निष्क्रियतेला दिला आळा
नागपूरच्या प्रत्येक गल्लीतून, शाळेतून, महाविद्यालयातून, आणि घराघरातून व्यसनाच्या विरोधात उठलेला आवाज होता. मी सर्व पोलिस अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. स्पष्ट आदेश दिले. कारवाई केवळ छोट्या विक्रेत्यांवर नाही, तर संपूर्ण ड्रग्ज साखळीवर होणार. त्याच रात्री, नागपूर एका अभूतपूर्व मोहिमेचा साक्षीदार झाला. 800 हून अधिक सराईत आरोपी ताब्यात घेतले गेले. MCOCA, PIT NDPS, MPDA यांसारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. ही केवळ कायद्याची धडक नव्हती, तर समाजाला दिलेला स्पष्ट संदेश होता.
नशेचा व्यापार इथे थांबतो. मात्र मोहिमेचा खरा गाभा होता व्यवस्थेतील सुधारणा. NDPS विभागात आमूलाग्र बदल झाले. निष्क्रिय अधिकाऱ्यांना बाजूला काढून, समर्पित अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सखोल तपास, वैज्ञानिक दृष्टिकोन, आणि बॅकवर्ड-फॉरवर्ड लिंकेजचा मागोवा घेत PIT NDPS अंतर्गत पहिल्यांदाच यशस्वी कारवाई झाली.प्रत्येक केस मागे एक वेदनादायक कथा होती. तपासादरम्यान अनेक धक्कादायक वास्तव समोर आले. ड्रग्ज पेडलर्स तरुण मुलं-मुलींना मोफत ड्रग्ज देत व्यसनात लोटतात. पुढे त्यांचं शोषण सुरू होतं.
पालकत्वाची खरी परीक्षा
काही मुली देहविक्रीच्या गर्तेत अडकतात. काही आत्महत्येचा मार्ग पत्करतात. ही आकडेवारी नव्हती या होत्या मौनातल्या किंकाळ्या.कारवाईसोबतच आम्ही जागरूकतेवर भर दिला. नागपूर शहरातील 87 हजारहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत आमचा व्यसनमुक्तीचा संदेश पोहचला. 17 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अँटी-ड्रग प्लेज घेतला. शाळा, कॉलेजात अँटी-ड्रग क्लब्स स्थापन करण्याची योजना आखण्यात आली. पोलीस आता फक्त कायद्याचे रक्षक नसून, मार्गदर्शक आणि समुपदेशक बनले आहेत.
मी सर्व पालकांना हात जोडून विनंती करतो मुलांचे पहिले मित्र बना. त्यांच्या वागण्यात बदल जाणवला, तर दुर्लक्ष करू नका. शिक्षकांनो, तुमचं एक निरीक्षण एखाद्याचे आयुष्य वाचवू शकते. तरुणांनो तुमच्यात ‘नाही’ म्हणण्याची ताकद आहे. तुमचे स्वप्न तुमच्या हाती आहे. 1 मार्च 2024 ते 17 जून 2025 या काळात, 540 प्रकरणं दाखल, 730 आरोपी अटकेत, आणि 8 कोटी 65 लाखांपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त करण्यात आले. पण ही आकडेवारी नव्हे, ही आहे संवेदनशीलतेने सजलेली शौर्यगाथा. 26 जून, आंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिन, एक स्मृती नव्हे एक कृतीचा दिवस ठरावा. एक आवाज, एक कृती, एक हस्तक्षेप कदाचित कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकेल.नशेला नाही म्हणूया, धैर्याला होकार द्या. व्यसनमुक्त नागपूरसाठी एकत्र येऊया. चला, या अंधारावर ‘थंडर’ करूया.