गेल्या अनेक काळापासून नागपूरला वाहतुकीच्या खेळखंडोबाचा वारसा लाभला आहे. तो थांबवण्यासाठी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर आता एक नवीन उपाय राबविण्यात आला आहे.
नागपूर, संत्र्यांच्या सुगंधाने भरलेली ही नगरी, जशी संत्र्यांच्या वारशाने ओळखली जाते, तशीच वाहतुकीच्या अराजकानेही कुप्रसिद्ध आहे. गेल्या अनेक दशकांपासून शहरातील रस्ते वाहनांच्या गर्दीने गजबजलेले असतात. ज्यामुळे ट्रॅफिक जाम, अपघात आणि प्रदूषण ही नागपूरकरांची नित्याची साथीदार झाली आहेत. दररोज हजारो वाहने रस्त्यावर धावत असताना, शहरवासीयांना सुरक्षित आणि सुगम प्रवासाची स्वप्ने पाहावी लागतात. मात्र, आता या ‘खेळखंडोबा’ला पूर्णविराम देण्यासाठी नागपूर पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. त्यांनी अवजड वाहनांसाठी शहर प्रवेशावर कठोर निर्बंध घातले आहेत. ज्यामुळे शहरातील रहदारी सुधारेल आणि नागरिकांना शांततेचा अनुभव मिळेल. रवींद्र सिंगल हे नाव नागपूरकरांसाठी आशेचा किरण आहेत.
सिंगल यांच्या नेतृत्वात यापूर्वी ‘ऑपरेशन थंडर’ सारख्या यशस्वी मोहिमा राबवल्या गेल्या. ज्याने गुन्हेगारीवर आळा घातला. आता ते वाहतुकीच्या समस्येवरही तितक्याच ताकदीने उतरले आहेत. अवजड वाहनांसाठी शहरात प्रवेशावर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. हे नियम 6 ऑक्टोबर 2025 पासून लागू झाले असून, शहरातील रहदारी सुधारण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. मागील पाच वर्षांत (2020 ते 2025) जड वाहनांमुळे 422 प्राणघातक अपघात झाले. ज्यात जणांचा मृत्यू झाला, 279 गंभीर अपघातात 563 जण जखमी झाले आणि 180 किरकोळ अपघातात 247 जणांना इजा झाली. हे आकडे पाहता, सिंगल यांनी नवीन आऊटर रिंग रोडचा वापर अनिवार्य केला आहे. ज्यामुळे शहरातील मुख्य रस्ते मोकळे राहतील. या अधिसूचनेच्या केंद्रस्थानी आहे जड वाहनांना शहराबाहेरून दुसऱ्या ठिकाणी जाताना आऊटर रिंग रोडचा वापर करणे.
Anil Deshmukh : सरन्यायाधीशांवरील हल्ल्यामागे ‘मनुवादी शक्तीचा कट’
विशिष्ट मार्गांचे नियोजन
अमरावती-नागपूर (एनएच-53) मार्गावरून जबलपूरकडे जाणाऱ्या वाहनांना गोंडखैरी टी पॉइंटवरून डावे वळण घेऊन नवीन अंडरपास आणि आऊटर रिंग रोडने खडका टोल नाका, झीरो समृद्धी सर्कल मार्गे पुढे जाणे बंधनकारक आहे. तसेच, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, हैदराबादकडे जाणाऱ्या वाहनांसाठीही विशिष्ट मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. हे मार्ग शहरातील गर्दी कमी करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत, ज्यामुळे नागपूरकरांना रोजच्या प्रवासात दिलासा मिळेल. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात यापूर्वीही जड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती, ज्यामुळे काही प्रमाणात यश मिळाले. आता ही योजना अधिक व्यापक आहे. भोपाल, बैतूल, छिंदवाडाकडून येणाऱ्या वाहनांना कोराडी पॉवर हाऊसवरून उजवे वळण घेऊन नवीन रिंग रोडने गोंडखैरी टी पॉइंट मार्गे पुढे जाणे आवश्यक आहे.
शहरातील एमआयडीसी, भारतीय खाद्य निगम गोदाम, रेल्वे मालधक्का, संत्रा मार्केट, लाल गोदाम, ट्रान्सपोर्टनगर फ्री झोन, इतवारी धान्य बाजार, गांधीबाग होलसेल मार्केट यासारख्या ठिकाणांसाठीही विशिष्ट मार्ग आणि वेळा ठरवण्यात आल्या आहेत. एमआयडीसीकडे जाणाऱ्या वाहनांना सकाळी 6 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत बंदी आहे. या नियमांमध्ये काही अपवादही आहेत. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, दूध यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठीच्या वाहनांना बंदी लागू नाही. तसेच, शासकीय वाहने, अग्निशमन दल, सैन्य आणि पोलिसांची वाहने, प्रवासी वाहतुक करणारी बस यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या वाहनांना सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत बंदी आहे. आवश्यकता असल्यास डेप्युटी कमिशनर ऑफ पोलिस (ट्रॅफिक) यांची परवानगी घ्यावी लागेल.
Shiv Sena : मुंबईत मोदी, कोर्टात फैसला; शिंदे की ठाकरे, कोणाचा डंका?
वाहतुकीसाठी नवीन दिशादर्शक
रवींद्र सिंगल यांनी या योजनेच्या यशासाठी ट्रक ओनर्स आणि असोसिएशनला आवाहन केले आहे. ट्रक चालकांनी डाव्या लेनचा वापर करावा, ताशी 30 किमी वेग मर्यादा पाळावी आणि शहरात अनावश्यक प्रवेश टाळावा असे सांगितले आहे. ज्या वाहनांना शहरात काम आहे, त्यांनी ईमेलद्वारे माहिती द्यावी. नियमभंग करणाऱ्यांवर 10 हजार रुपये दंड आणि वाहन जप्त करण्याची कारवाई होईल. याशिवाय, काही मुख्य रस्त्यांवर जसे रेसिडेन्सी रोड, माऊंट रोड, वेस्ट हायकोर्ट रोड इत्यादींवर जड वाहनांना विशिष्ट वेळेत पूर्ण बंदी आहे.रवींद्र सिंगल यांच्या या पावलामुळे नागपूरची वाहतुकीची समस्या संपेल असा आशावाद आहे. त्यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवल्यानंतर आता शहराच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीवर फोकस केला आहे. ही अधिसूचना 8 ऑक्टोबर 2025 पासून अमलात आहे. पुढील आदेशापर्यंत कायम राहील.
नागपूरकरांनी या नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सिंगल यांनी केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर शहरातील अपघात कमी होऊन प्रदूषणही घटेल, ज्यामुळे नागरिकांचे जीवन अधिक सुखकर होईल. या नवीन नियमांमुळे जड वाहने मुख्य शहरात कमी येतील आणि आऊटर रिंग रोडचा प्रभावी वापर होईल. सिंगल यांच्या नेतृत्वात नागपूर पोलिसांनी यापूर्वीही अनेक उपक्रम राबवले, जसे की रस्त्यावर थेट उतरून ट्रॅफिक नियंत्रण. आता ही योजना यशस्वी झाल्यास नागपूरला खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’चा दर्जा मिळेल.
