नागपूर शहरात पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली शिस्त आणि पारदर्शकतेसाठी कडक कारवाई करत पोलिसांना बडतर्फ करण्यात आले.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांच्या गडावर आता पोलीस शिस्तीचा महायज्ञ सुरू झाला आहे. गल्लीपासून प्रभागापर्यंत नागपूर शहरात शिस्तीचा नवा अध्याय लिहिला जातोय. रस्त्यांवरून वाहनचालकाला थांबवणं असो की गुन्हेगारी टोळ्यांना आवरणे प्रत्येक हालचालीत एकच संदेश स्पष्ट आहे, ‘शिस्त हवीच’. नागपूर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वात चालवण्यात येणाऱ्या ऑपरेशन थंडर आणि ऑपरेशन यु टर्नमुळे शहरात एक वेगळंच वातावरण तयार झाले आहे. गुन्हेगार असो वा वर्दळीचे वेळेचे ट्रॅफिक नियम तोडणारे सगळ्यांवर आता पोलिसांची नजर टोकाची आहे. शिस्तीच्या लाटेत सर्वप्रथम झटका बसला तो पोलीस दलातीलच काही काळ्याकृत्यांमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना.
बुधवारी (30 जुलै 2025) नागपूर पोलिसांनी तीन गंभीर प्रकरणांवर तातडीची कारवाई करत चार पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. तर एकाला निलंबित करण्यात आले. सुरुवात झाली ती कळमना पोलीस ठाण्यापासून. इथले सिपाही संदीप यादव आणि पंकज यादव यांनी एका 19 वर्षीय विद्यार्थ्याला खोट्या पॉक्सो प्रकरणात अडकवण्याची धमकी देत त्याच्याकडून 1 लाख 80 हजार रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून घेतली होती. मोबाईल लोकेशन आणि सोशल मीडियावरून मिळालेल्या पुराव्यांवरून त्यांची ओळख पटली आणि चौकशीत दोषी ठरल्यावर त्यांना बडतर्फ करण्यात आले. दुसरे प्रकरण अजूनच लाजीरवाणे आहे.
Chandrashekhar Bawankule : बांगलादेशी घुसखोरांचा कागदी गाडा उलथवणार
जुगार व्हिडीओचा पर्दाफाश
पुन्हा एकदा कळमना पोलिसच आरोपी. यावेळी मनोज घाडगे आणि भूषण साकडे. चौकीच्या चार भिंतींमध्ये जुगार खेळणं आणि धूम्रपान करणं, याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि पोलीस दलाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले. चौकशीत दोष निश्चित झाल्यानंतर या दोघांनाही नोकरीवरून हटवण्यात आले. मुख्यालयात तैनात असलेल्या सिपाही मोहसिन खान याच्यावर आरोप होते एका युवतीच्या अपहरणाचा आणि तिच्या आईसोबत गैरवर्तनाचा. लकडगंज पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आली. पोलीस आयुक्तांनी त्याला तातडीने निलंबित करत, यंत्रणेमध्ये शिस्तीचा संदेश पुन्हा एकदा ठामपणे दिला आहे.
नागपुरात या तीन कारवायांमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. डॉ. रवींद्र सिंगल यांच्या कारकिर्दीत पोलिस दलात कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही. त्यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले आहे की, शिस्त आणि प्रामाणिकपणा हे पोलीस खात्याचे आधारस्तंभ आहेत. जो कोणी त्याला धक्का लावेल, त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई होणारच. या पावलांमुळे नागपूरकरांच्या मनात पोलीस दलाविषयी नव्याने विश्वास निर्माण होत आहे. आता शिस्त ही निव्वळ मागणी नाही. ती नागपूरच्या रस्त्यांवर आणि चौकात अनुभवता येणारी एक वास्तवता बनली आहे. नागपूर पोलिसांचा हा शिस्तीचा यज्ञ पुढे काय रूप धारण करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.