प्रशासन

Nagpur : गुन्हेगारीच्या अंधारात नागपूर पोलिसांचा ‘थंडर’स्ट्रोक

Operation Thunder : गांजाचा कारखाना उधळला

Author

नागपुरात पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन थंडरने अवैध गांजाच्या वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. कळमना पोलिसांनी लाखो रुपयांच्या गांजासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

अंधाराच्या गर्तेतून गुन्हेगारीचे सावट उकलण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडरने आता खऱ्या अर्थाने ‘धडकी भरवणारा’ मोर्चा उघडला आहे. नागपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा वटवृक्ष रुजवण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान सुरू झाले आहे. गुन्हेगारांना थेट पायबंद घालणाऱ्या कारवायांनी शहरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवली आहे.

शहरात गांजाच्या अवैध वाहतुकीचा मोठा पर्दाफाश करत कळमना पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने तब्बल 27 लाख रुपये किमतीचा 108 किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईत अविनाश संजय ढोके आणि पलाश विदयाधर वानखेडे या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोघेही मोठ्या प्रमाणावर गांजाची वाहतूक करत होते आणि नागपूरमधील तरुण पिढीला नशेच्या गर्तेत लोटण्याच्या या कटकारस्थानाला पोलिसांनी वेळीच उधळून लावले.

Nana Patole : शर्यत अजून संपलेली नाही

अचूक सापळा

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीवरून कळमना पोलिसांना समजले की जबलपूर येथून गांजाची एक मोठी खेप एम. एच. 40 वाय 9962 क्रमांकाच्या सहा चाकी आयशर ट्रकद्वारे नागपूरच्या यशोधरानगर हद्दीत एच. बी. टाऊनमार्गे आणली जाणार आहे. ही माहिती मिळताच तपास पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई आखली.

पथकातील अधिकाऱ्यांनी दोन स्वतंत्र टीम तयार केल्या. एक टीम एच. बी. टाऊन चौकातील ब्रिजखाली तर दुसरी टीम चिखली चौकात लपून बसली. या सापळ्यातून ट्रकचा पाठलाग करत काली माता मंदिराजवळ त्या ट्रकला गाठण्यात आले. आरोपी ट्रक मधील गांजाची पोती मागे उभ्या असलेल्या महिंद्रा XUV 500 (एमएच 31 ईके 5232) मध्ये टाकत होते, तेवढ्यात पोलिसांनी कारवाई करत त्यांना पकडले.

Maharashtra : अमरावती – बल्लारपूरच्या श्रमिकांना आरोग्याचं कवच

बारीक लक्ष

या धडक कारवाईत दोन्ही वाहने, आयशर ट्रक आणि महिंद्रा XUV, तसेच एकूण 108 किलो वजनाचे गांजाचे पोती पोलिसांनी जप्त केले. जप्त केलेल्या गांजाची एकूण अंदाजित बाजारभावातील किंमत 27 लाख रुपये इतकी आहे. या प्रकरणात नागपूर शहराबरोबरच बाहेरील राज्यातील गुन्हेगारांचे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिक खोलवर जात असून, पोलीस विविध राज्यांतील कनेक्शनवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आगामी काळात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या प्रकरणात केलेल्या प्रभावी कारवाईचे श्रेय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखालील ऑपरेशन थंडरला जाते. नागपूरमधील गुन्हेगारी प्रवृत्ती आणि नशेच्या व्यवसायाला पायबंद घालण्यासाठी सिंगल यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण पोलिस दल झपाट्याने काम करत आहे. कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुधाकर कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखालील तपास पथकात उपनिरीक्षक राजेश पवार, कर्मचारी प्रविण वानखेडे, सुरज नवले, प्रदीप कराळे, सचिन बोंद्रे, बाळू खांदे, बबलू यादव, सागर चव्हाण, पंकज गवई यांचा विशेष सहभाग होता. या पथकाने अत्यंत शिस्तबद्ध आणि धाडसी पद्धतीने कारवाई पार पाडली.

नागपूर पोलीस दलाचा हा निर्धार आता स्पष्ट झाला आहे. कोणताही गुन्हेगार आणि कोणताही अवैध व्यापार शहरात सुरक्षित नाही. ऑपरेशन थंडरच्या विजेच्या झटक्याने गुन्हेगारीच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दिवा लागला आहे. नशेचा खेळ संपवण्यासाठी पोलिसांचा खेळपट्ट्यावर प्रवेश झाला आहे,आता फक्त ‘क्लीन सिटी, क्लीन माइंड’.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!