
राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंमली पदार्थ तस्करीचा मुद्दा गाजत असतानाच नागपूरमध्ये मोठी कारवाई झाली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गुल्लू वर्मा टोळीवर मकोका लागू करत गुन्हेगारीच्या मुसक्या आवळल्या.
राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. या पार्श्वभूमीवर कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका लागू करण्याची घोषणा केली. मात्र, याची अंमलबजावणी अद्याप स्पष्टपणे होते की नाही, यावरून विरोधकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान, नागपूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या एका राक्षसी टोळीवर मोठी कारवाई करत मकोका लावल्याचे स्पष्ट केले आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली.

Sandip Joshi : आमदार ठरले विद्यार्थ्यांच्या भवितव्याचे संरक्षक
गुन्हेगाऱ्यांवर मकोकाची छाया
गुन्हेगारी जगतातील एक महत्त्वाचं नाव ठरलेला आशिष उर्फ गुल्लू राजबहादूर वर्मा हा या टोळीचा मुख्य म्होरक्या आहे. त्याच्यासोबत रोहित देशराज सूर्यवंशी, सुरज उर्फ बारीक रमेश वरणकर, विश्वास राहुल सोलंकी, अभिषेक उर्फ छोटू अनिल सिंग, गब्बर दत्तूजी जुमळे, उदयभान गंगासागर चव्हाण, लखनसिंग उर्फ विजय सिंग सिकलकर, शाहरूप उर्फ सारोप रमेश राजपूत आणि राकेश उर्फ सोनू शिवलाल सूर्यवंशी हे दहा जण यामध्ये सामील आहेत. पोलिसांनी या सर्वांविरुद्ध मकोका कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
वलनी परिसरात 27 एप्रिल 2025 रोजी पोलिसांना एका खबऱ्यांमार्फत महत्त्वाची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार आशिष वर्मा आपल्या साथीदार अभिषेक सिंगच्या घरी शस्त्रांसह उपस्थित होता. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी छापा टाकून आशिष वर्मा आणि गब्बर जुमळे यांना अटक केली. त्या वेळी घरझडतीत 1028.05 ग्रॅम अंमली पदार्थ, 6 अग्निशस्त्रे, 36 जिवंत काडतुसे, 2 रिकाम्या पुगळी, 8 अँड्रॉईड मोबाईल फोन, सिमकार्डसह 2 लाख 71 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
गुन्हेगारीच्या मुळावर घाव
कारवाईमुळे या टोळीच्या व्यापक गुन्हेगारी जाळ्याचा पर्दाफाश झाला. अंमली पदार्थ विक्रीचा गैरव्यवसाय आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचे काम ही टोळी सातत्याने करत होती. या टोळीच्या प्रत्येक हालचालीवर पोलिसांची नजर होती. अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये या टोळीचा हात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
टोळीने अंमली पदार्थ विक्रीसोबतच खून, खूनाचा प्रयत्न, प्राणघातक शस्त्र बाळगणे, अवैध दारू आणि शस्त्रांची तस्करी, अशी गंभीर गुन्हेगारी यंत्रणा तयार केली होती. टोळीचा म्होरक्या आशिष वर्मा केवळ जुने साथीदारच नाही, तर नविन गुन्हेगारांना हाताशी धरून टोळी वाढवत होता.
पोलिसांनी वेळोवेळी या टोळीवर कारवाई केली तरीही त्यांची गुन्हेगारी थांबली नाही. अखेर या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईमुळे इतर गुन्हेगारी टोळ्यांनाही धडा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मकोका लावण्याचा उद्देश म्हणजे केवळ शिक्षा देणे नाही, तर गुन्हेगारीची मुळे उखडून फेकणे हाच आहे. त्यामुळे ही कारवाई फडणवीस सरकारच्या कारभारात एक निर्णायक टप्पा ठरण्याची शक्यता आहे.
डॉ. दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ग्रामीण पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई केली आहे. गुन्हेगारांविरुद्ध कठोर कायदेशीर उपाय योजल्याने नागपूर परिसरात काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. मात्र या कारवायांचा प्रभाव दीर्घकालीन राहावा, यासाठी प्रशासनाने व पोलिसांनी सतत पाळत ठेवणे आवश्यक आहे.