
नागपूर पोलिसांनी 22 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान 48 तासांची विशेष कॉम्बिंग मोहीम राबवली. या मोहिमेत 305 संशयितांची तपासणी करण्यात आली. विविध गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या आरोपींवर कारवाई केली.
शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक गती देत नागपूर पोलिसांनी एक कठोर पाऊल उचलले. 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2025 दरम्यान 48 तासांची विशेष कॉम्बिंग मोहीम राबवण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या काटेकोर मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहिमेत नागपूर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 305 संशयितांवर थेट कारवाई करण्यात आली.
मोहिमेचा उद्देश अत्यंत स्पष्ट होता तो म्हणजे, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे, त्यांना नियंत्रणात ठेवणे आणि संभाव्य गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध घालणे. या मोहिमेत उपआयुक्त परमसिंग, गुन्हे शाखेचे अधिकारी आणि फील्ड कर्मचारी यांनी अथक मेहनत घेतली. 33 पोलीस ठाण्यांच्या एकत्रित सहभागातून ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली.

Vijay Wadettiwar : पर्यटकांचे प्राण गेले, पण तुम्ही उपकार गिनता
गुन्हेगारीविरोधात सुसूत्र नियोजन
तपास मोहिमेदरम्यान 103 तडीपार गुन्हेगार, 18 मकोका अंतर्गत आरोपी, 18 इतिहासधारक गुन्हेगार, 25 गंभीर शारीरिक मारहाणीतील आरोपी, 3 दारूबंदी कायद्यान्वये आरोपी, 5 एमपीडीए अंतर्गत आरोपी, 1 बेकायदेशीर शस्त्र बाळगणारा व 1 अल्पवयीन संशयित यांच्यावर थेट कारवाई करण्यात आली. काही संशयित घरी नसल्याचे आढळल्याने त्यांच्या शोधासाठी पुढील टप्प्यातील कारवाई सुरू करण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये नव्याने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काही गुन्हेगार सध्या तपासाअंती अडचणीत आले आहेत.
मोहिमेदरम्यान पोलिसांनी घराघरात जाऊन संशयितांची तपासणी केली. काही प्रकरणांत आरोपींनी बनावट नावे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी आजारी असल्याचे भासवले किंवा सरकारी सेवेत कार्यरत असल्याचे सांगून मोकळे होण्याचा प्रयत्न केला. पाणीपुरवठा, शिक्षण, वीज वितरण आणि गस्त पथकांमध्ये नोकरी करणाऱ्यांनी आपले व्यावसायिक रूप दाखवत पोलीस तपास चुकवण्याचा प्रयत्न केला. काही आरोपी सामान्य नागरिकासारखे दिसत होते. मात्र त्यांची हलचाल, सोशल मीडियावरील सक्रियता आणि वर्तनसंस्था संशयास्पद असल्याचे स्पष्ट झाले. अशा सर्व प्रकरणांमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी पुढील कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.
कठोरतेचा प्रभाव
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर शहरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिम आता अधिक ठोस आणि प्रभावी बनल्या आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यशैलीमुळे आणि पोलिस दलातील संघटन क्षमतेमुळे या मोहिमेला भक्कम यश लाभले आहे. अशा प्रकारच्या मोहिम केवळ गुन्हेगारांवर कारवाई करत नाहीत, तर शहरातील नागरिकांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास जागवतात.
डॉ. सिंगल यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की नागपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कॉम्बिंग मोहिम नियमितपणे राबवण्यात येणार आहेत. गुन्हेगारीला खतपाणी घालणाऱ्यांना कोणतीही माफी दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे. नागपूर शहर आता सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सक्षम आणि सजग बनत आहे.
Chandrashekhar Bawankule : आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सावली नको