
नागपूर पोलिसांनी केलेल्या कारवाई 66 लाख रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. नवीन वर्षाच्या पार्टीसाठी ही ड्रग्स तस्करी केली जात होती.
नवीन वर्षाच्या पार्टीसाठी नागपूरमध्ये आणलेले ड्रग्स पोलिसांच्या क्राइम ब्रांचने जप्त केले. महाराष्ट्राला ड्रग्स मुक्त करण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. आता देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांच्या गृह जिल्ह्यात अमलीपदार्थ पकडण्याची यशस्वी कामगिरी नागपूर पोलिसांनी केली आहे.
31 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये अनेक ठिकाणी न्यू इयर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्टीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणाईला ड्रग्स पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तस्करी करण्यात येत होती. या संदर्भातील माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचला. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाई 554 ग्राम मेफेड्रोन (MD) पावडर जप्त करण्यात आली.

तस्करीतील Duster जप्त
पोलिसांनी कारवाईमध्ये एक डस्टर वाहन जप्त केले. याशिवाय 81 हजार किमतीचे मोबाईल फोनही जप्त करण्यात आलेत. या संदर्भात कोराडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अमलीपदार्थ विरोधी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. न्यू इयर पार्टीसाठी नागपूरमध्ये ड्रग्सची कन्साइनमेंट येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यामध्ये पवन उर्फ मिहिर मिश्रा, पलास दिवेकर, सुमित चिंतलवार शेख अतीक फरीद शेख उर्फ भुरू, मनीष कुशवाहा यांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याजवळ ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला. पकडण्यात आलेल्या आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा देखील दाखल असल्याचे उघडकीस आले आहे. या आरोपींविरुद्ध मोक्काअंतर्गतही कारवाई झालेली आहे.
पकडण्यात आलेल्या तस्करांनी राजस्थानमधून ड्रग्स नागपुरात आणल्याची माहिती आहे. अजय सिसोदिया नावाच्या व्यक्तीने राजस्थानमधून हे ड्रग्स पुरवल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अजय आणि नागपुरातील या तरुणांनी हे अमलीपदार्थ कुठून आणले, याची चौकशी केली जात आहे. ड्रग्स तस्करीच्या या टोळीच्या आंतरराष्ट्रीय संबंध आहे का? याची तपासणी देखील केली जाणार आहे.
प्रशासन High Alert
नवीन वर्ष पार्टीच्या अनुषंगाने नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक हॉटेलवर पोलिसांची नजर राहणार आहे. पब आणि रुफ टॉप हॉटेलवरही पोलीस लक्ष ठेवून राहणार आहेत. 31 डिसेंबरला दुपारपासूनच नाकाबंदी करण्यात येणार आहे. नागपूर शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. पोलीस विभागाचे सामाजिक सुरक्षा पथकही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, तपासणी करणार आहे.