
राज्यात परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटनांवरून विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. सत्ताधाऱ्यांवर आरोपांचे बाण विरोधक सोडत आहेत. राज्य सरकारवर टीका करीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर आरोप केले आहेत.
राज्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना, गुंडांना, बीड आणि परभणीतील दुर्दैवी घटनांना राज्य सरकार बळ देत आहे. मूळ विषयांवर ठोस निर्णय घेण्याऐवजी सरकार जनतेचे लक्ष विलचित करीत आहे. त्यामुळे हे दोन्ही प्रकरणे तापत आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. मंगळवारी 14 जानेवारी रोजी नागपुरात नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी संपर्क साधला.
बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची गुंडांनी हत्या केली. परभणी जिल्ह्यात आंदोलक युवकाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणांना महिन्यांहून अधिक काळ उलटुन गेला आहे. सरपंच हत्येप्रकरणी जनता राज्यभरात आंदोलन करीत आहे. त्याबाबत पटोले यांनी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे.

नाना पटोले म्हणाले की, बीड आणि परभणीतील घटनांमुळे राज्य सरकार प्रायोजित जंगलराज तयार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचे देखील यांनीच केले आहे. अशा घटनांमुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. मात्र राज्य सरकार दोन्ही प्रकरणांमागील मूळ मुद्द्याला लपवून ठेवत आहे. त्यामुळे परभणी आणि बीड प्रकरण तापत आहे. मंत्रिमंडळात स्वामी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत. राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्यासाठी मागणी होत आहे. संपूर्ण घटनेची माहिती सरकारकडे आहे. परंतु संबंधित मंत्र्याचा मंत्रिमंडळातून राजीनामा घेतला जात नाही. काँग्रेसची सत्ता असताना मंत्र्यांवर कुठलेही आरोप झाल्यानंतर तातडीने राजीनामे दिले जात होते. परंतु आता मनमानी सुरू आहे. जनतेने कोणाकडे न्याय मागावा ? अशा शब्दांत टीका करत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर आरोप केले आहेत.
BJP नेत्याचाच आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मंत्री बीड येथील खुनात आरोपी आहे, असा आरोप भाजपच्याच आमदाराकडून सातत्याने करण्यात येत आहे. सरपंच हत्या प्रकरणामुळे महायुतीत फूट पडली आहे. परंतु सत्ताधारी महाविकास आघाडीत फूट पडल्याचे खोटे वृत्त पसरवत आहेत, असे नाना पटोले म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक अद्यापही जाहीर झाली नाही. आता निवडणूक होणार की नाही, अशी शंका निर्माण होत आहे. जेव्हा निवडणूक होईल तेव्हा पाहू. परभणी जिल्ह्यातील प्रकरणात एका तरुणाचा जीव गेला. परंतु मुख्यमंत्री म्हणतात की, तो दम्याचा रुग्ण असल्याने त्याचा मृत्यू झाला. त्याबाबत आम्ही हक्कभंग आणणार आहे. सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड याचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे कराडला या प्रकरणापासून अलिप्त ठेवण्यात येत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.