
राजकीय वैर बाजूला ठेवत भंडाऱ्यात काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर एकत्र आले आहेत. दुग्ध संघाच्या निवडणुकीसाठी या विरोधकांची अनपेक्षित युती सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.
एकीकडे राज्यात काँग्रेस आणि शिंदे गट तलवारी उपसत आहेत. भंडाऱ्यात मात्र राजकीय घडामोडींनी वेगळेच वळण घेतले आहे. दोन विरुद्ध टोकांचे आमदार काँग्रेसचे नाना पटोले आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नरेंद्र भोंडेकर एकाच चुलीवर दूध तापवायला सज्ज झाले आहेत. दुग्ध संघाच्या निवडणुकीत या दोन नेत्यांनी एकत्र युती करत, भंडाऱ्यातील सहकार क्षेत्रात नवा इतिहास रचण्याची सुरुवात केली आहे.
विरोधी पक्षाच्या दोन राजकीय गटांचे आमदार दुग्ध संघाच्या निवडणुकीत ‘एकत्र’ का आले? राजकारणात ‘शाश्वत’ काहीच नसतं याचं हे ताजं उदाहरण. युतीचं हे नातं म्हणजे कुणीही कायमचा विरोधक नसतो, हे सिद्ध करणारा भंडाऱ्याचा ‘सहकार प्रयोग’ आहे. याबाबत आमदार नाना पटोले म्हणतात, सहकार म्हणजे जनतेसाठीची चळवळ. ही लढाई आहे जिल्ह्याच्या दूध उत्पादकांची. आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे उत्तरही जळजळीत आहे. भोंडेकर म्हणाले, ज्यांनी दूध संघाची वाट लावली, त्यांच्या विरोधातच आम्ही मैदानात उतरलोय.

एकत्र येण्याचा उद्देश
या दोघांचे मुद्दे जरी सामाजिक न्यायाभोवती फिरताना दिसत असले, तरी राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना ऊत आला आहे. या निवडणुकीनंतर बँक, बाजार समिती आणि अगदी महानगरपालिकांच्या निवडणुकीतसुद्धा अशीच ‘विचित्र पण यशस्वी’ समीकरणं पाहायला मिळतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही केवळ दुग्ध संघापुरतीच भागीदारी आहे का, की पटोले-भोंडेकरांचा हा युती प्रयोग राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी ठरणार आहे? या प्रश्नाचं उत्तर भविष्यात स्पष्ट होईल. पण आत्ताच एवढं नक्की, सहकाराच्या गाभाऱ्यात राजकारणाचा प्रसाद पुन्हा एकदा वाटला जात आहे.
शब्दांच्या कलाकृतीत, नाना पटोले म्हणतात, सहकारामध्ये पक्ष नसतो, तिथं लोकांचा लाभ आणि विकास हाच अजेंडा असतो. आमदार भोंडेकर शिवसेनेचे असले, तरी त्यांची दृष्टी विकासाची आहे. भोंडेकर यांनी थेट आरोपच केला की, स्वतःला सहकार महर्षी म्हणवणाऱ्यांनीच भंडाऱ्याच्या दूध संघाची वाट लावली. आता आम्ही त्यांना थांबवणार. या निवडणुकीत कोण जिंकेल हे अजून स्पष्ट नाही, पण भंडाऱ्यात जिंकलंय ते एक महत्त्वाचं तत्व म्हणजे ‘विरोध विसरून जनविकासासाठी हातमिळवणी’.
Parinay Fuke : आमदारांच्या छत्रछायेत विरोधी नेत्यांची भाजपात नवी साथ
राजकारणात कायमस्वरूपी काहीही नसतं. परस्परविरोधी विचारांचे दोन दिग्गज आता भंडाऱ्याच्या सहकाराच्या क्षेत्रात एकत्र आले आहेत. ही निवडणूक केवळ दूध संघापुरती नाही. ती बदलत्या राजकारणाची केवळ एक झलक असू शकते. कदाचित, या ‘श्वेत युती’तूनच नव्या राजकीय प्रवाहाची सुरुवात होणार, असा अंदाज लावण्यात येत आहे.