महाराष्ट्र

Congress : सद्भावना यात्रेत सगळे होते, पण नाना नव्हते 

Nagpur : काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षांच्या अनुपस्थितीने राजकीय वर्तुळात वादळ 

Share:

Author

विदर्भात काँग्रेसने एकतेचा सूर लावण्याचा प्रयत्न केला, पण नाना पटोले यांच्या अनुपस्थितीने सगळा रागच बिघडला. सर्व वरिष्ठ नेते रस्त्यावर उतरले, पण माजी प्रदेशाध्यक्ष कुठेच दिसले नाहीत आणि चर्चेला तोंड फूटले.

काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर काहीसे मागे पडलेले वाटणारे नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. बुधवारी नागपूरमध्ये काँग्रेसकडून आयोजित करण्यात आलेल्या सद्भावना शांती यात्रेत पटोले यांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली. या यात्रेमध्ये काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, याचवेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विदर्भातील मजबूत नेता मानले जाणारे नाना पटोले गैरहजर राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

17 मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ‘सद्भावना शांती यात्रा’चे आयोजन केले होते. गांधीगेट (महाल) पासून सुरु झालेली ही यात्रा राजवाडा पॅलेसपर्यंत पोहोचली. शांती, ऐक्य व सामाजिक सलोखा जपण्याचा संदेश देणाऱ्या या यात्रेला काँग्रेसने पूर्ण ताकदीनिशी पुढे नेले. मात्र नाना पटोले यांची अनुपस्थिती या एकतेच्या प्रदर्शनात एक मोठी उणीव भासत होती.

चर्चांना फुटले तोंड

राजकीय वर्तुळात यामुळे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. दोन महिन्यांपूर्वी नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. त्यांच्या जागी हर्षवर्धन सपकाल यांची नियुक्ती झाली. त्यानंतरपासूनच पटोले सार्वजनिक कार्यक्रमांपासून काहीसे दूर असल्याचे चित्र आहे. आता या यात्रेतून दूर राहणं ही केवळ योगायोग आहे की त्यांच्या नाराजगीचं सूचक, यावर चर्चा रंगू लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नाना पटोले पक्षातील काही निर्णयांवर नाराज असल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर त्यांनी फारसे सार्वजनिक वक्तव्य केलं नाही, पण त्यांच्या सक्रियतेत कमालीची घट झाली आहे. विदर्भात त्यांचा मोठा प्रभाव आहे, विशेषतः ग्रामीण भागात. अशा नेत्याच्या अशी वेळोवेळी अनुपस्थिती पक्षासाठी देखील चिंतेची बाब ठरू शकते.

Amravati : टेक्स्टाईल पार्क देणार दोन लाख रोजगारांच्या संधी

नाना पटोले हे एक अनुभवी व लढवय्ये नेते आहेत. शरद पवार यांच्या विरोधात लढत भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले पटोले यांनी शेतकरी प्रश्नांवर नेहमीच आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. त्यांनी काँग्रेसला विदर्भात पुन्हा उभं करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली होती. अशा स्थितीत त्यांची सततची अनुपस्थिती आणि शांतता पक्षासाठी इशारा मानली जात आहे. राजकीय नजरा आता याकडे लागलेल्या आहेत की, नाना पटोले पक्षातच राहून अंतर्गत मतभेद दूर करतील की नव्या राजकीय समीकरणांचा भाग बनतील? हे येणारा काळच सांगेल. मात्र एक गोष्ट नक्की आहे की, पटोले यांच्या हालचालींवर संपूर्ण राज्याचे राजकीय वर्तुळ बारकाईने नजर ठेवून आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!