
राज्याचं राजकारण पावसाळी अधिवेशनाच्या गोंधळात अडकलेलं असताना, एका मुद्द्याने पुन्हा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोशावर नाना पटोलेंनी सभागृहात वादळ निर्माण केलं आहे.
राज्याचं राजकारण सध्या एका विचित्र वळणावर येऊन पोहोचलेलं दिसतंय. पावसाळी अधिवेशनाचा प्रारंभच गोंधळाच्या सावटाखाली झाला आहे. पहिल्याच दिवशी सरकार आणि विरोधकांमध्ये चुरस रंगली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाचे आक्रमक शिलेदार नाना पटोले पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. यावेळी त्यांनी आपल्या लक्षवेधी शैलीने सभागृहात थेट संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोट ठेवत सरकारला चांगलेच धारेवर धरले.
राज्यात यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेती संकटात सापडली आहे. विशेषतः विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी या संकटाने होरपळून निघाले आहेत. पाणीटंचाईमुळे संत्रा बागा वाळू लागल्या आहेत. यावर फायटोप्थोरा या जीवघेण्या बुरशीजन्य रोगाने हल्ला चढवला आहे. रोगाचा प्रादुर्भाव इतका झपाट्याने वाढत आहे की शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

Sudhir Mungantiwar : बळीराजाच्या लुटीच्या लिंकला मुनगंटीवारांची काट
सरकारची उपाययोजना
संत्रा हे विदर्भाचे अर्थचक्र हलवणारे प्रमुख पीक. पण यावर्षी या पिकावर फायटोप्थोरा नावाच्या रोगाने धुमाकूळ घातल्यामुळे राज्यातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या उध्वस्त झाले आहेत. नाना पटोले यांनी याच मुद्द्यावर विधानसभेत आवाज उठवला. त्यांनी स्पष्ट विचारले, शासन शेतकऱ्यांसाठी कोणती मदत करणार? आणि या रोगाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना काय असणार?
नाना पटोले यांनी सभागृहात सडेतोड भाषण करत सरकारला विचारले की, सतत संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता तरी ठोस पावलं उचलली जातील का? की नेहमीप्रमाणे आश्वासनांचं गाजर दाखवून ही बाबही थंडबस्त्यात टाकली जाईल?
पुन्हा संघर्षशील अवतार
फायटोप्थोराच्या या मुद्द्यावर भाष्य करताना नाना पटोले यांचा आक्रमक पवित्रा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. त्यांनी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी अध्यक्षांच्या आसनावर चढून जोरदार निदर्शने केली होती. यामुळे त्यांना एक दिवसासाठी सभागृहातून निलंबितही करण्यात आलं होतं. पण यामुळे त्यांच्या आवाजात जराही सौम्यता आली नाही.
संत्रा उत्पादकांच्या संकटाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, शेतकऱ्यांच्या पाठीशी न उभं राहणाऱ्या सरकारला आम्ही गप्प बसू देणार नाही. राज्यातील बागायतदारांवर आलेले हे संकट केवळ शेतीचे नव्हे, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचं संकट आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
लढा सुरूच राहील
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची हाक विधानसभेत पोहोचवून नाना पटोले यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं की ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोणतीही राजकीय किंमत मोजूनही लढा देण्यास तयार आहेत. आता लक्ष आहे ते सरकारच्या निर्णयावर. शासन संत्रा उत्पादकांना केवळ आश्वासनं देणार की ठोस मदतीचा हातही देणार?
मराठी राज्यकारणात जिथे संधीसाधूपणा आणि मौन अधिक दिसतो. तिथे शेतकऱ्यांची व्यथा गगनभेदी आवाजात सांगणारे नेते ठळक ठरतात. नाना पटोले हे त्याच पठडीतले, आवाज उठवणारे, संघर्ष करणारे आणि शासनाला जागं करणारे.