
विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं खापर अखेर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फुटलं आहे. पटोले यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागेवर अमित देशमुख यांचं नाव निश्चित झालं आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या कार्यालयातील महत्वाच्या नेत्यांन ‘द लोकहित लाइव्ह’ला ही माहिती दिली.
गेल्या काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये ‘अमित’पर्वाचा उदय झाला. मोदी आणि शाह या जोडीनं केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रसार माध्यमांचं लक्ष वेधलं. आता असंच ‘अमित’पर्व महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये सुरू होणार आहे. मात्र हे पर्व मोटाभाई अमित शाह यांचं नाही. हे पर्व राहणार आहे अमित देशमुख यांचं. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी अमित देशमुख यांचं नाव निश्चित झालं आहे. लवकरच त्याची अधिकृत घोषणा होणार आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळ असलेल्या एका जबाबदार नेत्यानं ही माहिती ‘द लोकहित लाइव्ह’ला दिली.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून राज्यात पटोले हटाव मोहिम सुरू झाली. काँग्रेसचे सगळेच नेते पटोले यांच्या विरोधात होते. राहुल गांधी वगळता दिल्लीतूनही पटोले यांना हटविण्यासाठी मोठी ‘फिल्डिंग’ लागली होती. त्यामुळं आज न उद्या आपल्याला जावं लागणार ही बाब पटोले यांना ठाऊक झाली होती. त्यामुळं पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा स्वत:च सादर केला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र ही प्रक्रिया ‘होल्ड’ करण्यात आली होती. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांचा चालेल अशा चेहऱ्याच्या राहुल गांधी शोधात होते. त्यानंतर शनिवारी, 18 जानेवारीला राहुल यांनी अमित यांचं नाव निश्चित केलं.

लवकरच घोषणा
अमित देशमुख यांच्या नावाची आता अधिकृत घोषणा तेवढी बाकी आहे. राहुल गांधी यांना तरूण चेहऱ्याचा शोध होता. याशिवाय अनेक निकषांची फुटपट्टी त्यांनी लावली होती. यातील जवळपास अनेक मापदंडात अमित देशमुख यांचा चेहरा ‘फिट’ बसला. अमित देशमुख हे काँग्रेसचे दिवंगत नेते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आहेत. 48 वर्षीय अमित यांच्या भोवती आजजपर्यंत कोणत्याही वादाचं वलय नाही. कमी वयात त्यांना भरपूर राजकीय अनुभव आहे. विलासराव देशमुख यांच्याकडून त्यांना अभिमन्यूप्रमाणं राजकारणाचं बाळकडू मिळालं आहे. अमित युवक काँग्रेसचे उपाध्यक्षही होते. महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळात त्यांनी कामही केलं आहे.
सद्य:स्थितीत अमित देशमुख हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव आहेत. 2009 पासून आमदार, 20214 मध्ये राज्यमंत्री, 2019 मध्ये कॅबिनेट मंत्री असा त्यांना अनुभव आहे. मात्र अमित देशमुख हे प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसच्या ‘हायकमांड’कडून त्यांना समजाविण्याचे प्रयत्न केले जात आहे. अमित देशमुख यांच्यासह सतेज पाटील यांचंही नाव चर्चेत होतं. त्यातील देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.