
गोंदिया जिल्ह्यातील क्रीडा विभागात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. गोंदियाच्या वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांना अखेर निलंबनाची कारवाई झेलावी लागली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयात मोठा गैरव्यवहार उघडकीस आल्याने संपूर्ण विभागात खळबळ उडाली आहे. क्रीडा साहित्य खरेदीतील गंभीर अनियमितता आणि मनमानी कारभाराच्या पार्श्वभूमीवर गोंदियाचे वादग्रस्त जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांना अखेर 13 मे रोजी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई क्रीडा व युवक सेवा सहसंचालक सुधीर मोरे यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.
खरपुडे यांच्यावर आधीपासूनच अनेक गंभीर आरोपांची मालिका आहे. त्यांनी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांकडे साफ दुर्लक्ष करून क्रीडा साहित्याच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया नियमबाह्यरित्या पार पाडली. चौकशीत हे स्पष्ट झाले की, त्यांनी कोणत्याही मान्यतेशिवाय परस्पर क्रीडा साहित्याचे आदेश देत लाखो रुपयांचे साहित्य खरेदी केले. त्यामुळेच पुणे येथील आयुक्तांनी त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमांतर्गत शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू करण्याची शिफारस केली होती.

लाखोंची लाच
खरपुडे यांचा संपूर्ण कार्यकाळ विविध जिल्ह्यांमध्ये वादग्रस्त ठरलेला आहे. धुळे येथे कार्यरत असताना त्यांनी व्यायामशाळा साहित्य खरेदी व भंडारगृह बांधकामाच्या अनुदानासाठी 35 हजार रुपयांची लाच घेतल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत सिद्ध झाले. बीड येथे असताना त्यांनी सात व्यायाम शाळांसाठी अनुदानाच्या बदल्यात 2 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 80 हजार रुपये त्यांच्या शिपायामार्फत स्वीकारले गेले होते. या प्रकरणात लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी छापा टाकून 11 लाख 37 हजारांची रोख रक्कम तसेच सोने-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले होते.
यवतमाळ जिल्ह्यातील त्यांच्या कार्यकाळात आणखी एक मोठा घोटाळा समोर आला. जिथे जिम्नॅस्टिक्स प्रशिक्षक किंवा खेळाडू नसतानाही त्यांनी तब्बल 95 लाख रुपयांचे साहित्य खरेदी केल्याचे उघड झाले. सध्या हे प्रकरण चौकशीत आहे. गोंदिया जिल्ह्यात देखील त्यांचा कार्यकाळ प्रचंड वादग्रस्त राहिला आहे. येथेही त्यांनी क्रीडा साहित्य खरेदीसंदर्भात नियम धाब्यावर बसवले. अनुदानासाठी पैसे मागण्याचे प्रकार आणि मनमानी निर्णय घेण्यामुळे कर्मचाऱ्यांत तसेच स्थानिक क्रीडाप्रेमींमध्ये असंतोषाची भावना होती.
या सर्व घटनांमुळे गोंदिया जिल्ह्यातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता या प्रकरणातील पुढील चौकशी आणि कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.