महायुतीचा धर्म झुगारून दुग्ध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी केलेले आमदार नरेंद्र भोंडेकर आता पुन्हा भगव्या तंबूत परतले आहेत. भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या पॅनलमधून मैदानात उतरत पुनरागमनाची ठसठशीत नोंद केली आहे.
नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचा धर्म बाजूला ठेवत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासोबत युती करताच, राजकीय वर्तुळात मोठा खळबळ उडाली होती. महायुतीतील एकनाथ शिंदे गटाचे आमदार असूनही त्यांनी विरोधकांशी हातमिळवणी केल्याने महायुतीतील भाजप आमदार डॉ. परिणय फुके काहीसे नाराज झाले होते. फुके यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मदत केल्याची आठवण भोंडेकरांना करून दिली होती.
दुग्ध संघाच्या निवडणुकीत स्थानिक राजकीय समीकरणांच्या अनुषंगाने आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यासोबत युती केली होती. मात्र, कोणतेही वैयक्तिक मतभेद न ठेवता, सहकार क्षेत्रातील स्थैर्य आणि विकासाला प्राधान्य देत, त्यांनी आता पुन्हा महायुतीत सहभाग नोंदवला आहे. हे पुनरागमन शक्य झालं ते आमदार परिणय फुके यांच्या समन्वयी भूमिकेमुळे. फुके यांनी कोणताही मुद्दा व्यक्तिशः न घेता समविचारांची बैठक जपली आणि त्याच सकारात्मकतेतून भोंडेकर यांचा महायुतीकडे पुनर्विचार झाला , तोही पूर्ण उत्साहात आणि ठामपणे.
या नाट्यमय वळणांमुळे महायुतीत अंतर्गत ताण वाढत गेले. परंतु, दूध संघाच्या निवडणुकीत भोंडेकर यांचा एकही उमेदवार निवडून न आल्याने त्यांना वस्तुस्थितीची जाणीव झाली. आता त्यांनी आपली चूक सुधारत महायुतीच्या सहकारी रणांगणात पुनरागमन केलं आहे. भंडारा जिल्हा सहकारी बँकेच्या 27 जुलैला होणाऱ्या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या पॅनलसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘सुबह का भूला अगर शाम को घर लौट आए, तो उसे भूला नहीं कहतेव’ ही म्हण यानिमित्तानं पुन्हा एकदा खरी ठरली आहे.
नेत्यांचा पाठिंबा
या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदेगट असे महायुतीचे 21 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. या पॅनलमध्ये कैलाश नशीने, धर्मराव भलावी, सुनील फुंडे, प्रकाश मालगावे, प्रशांत पवार, प्रदीप पडोले, संदीप फुंडे, चेतक डोंगरे, योगेश हेडाऊ, आशा गायधाने, टीरा तुमसरे, नाना पंचबुधे, कवलजीतसिंह चड्ढा, विश्वनाथ कारेमोरे, होमराज कपगते, रामदयाल पारधी, अनिल सर्वे, सदानंद बर्डे, जितेश इखर, धर्मेंद्र बोरकर, श्रीकांत वैरागडे यांचा समावेश आहे.
या लढतीचं नेतृत्व भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर करत आहेत. यांना माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजू कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे यांची मजबूत साथ लाभत आहे. दुसरीकडे, नाना पटोले यांना भोंडेकर पुन्हा साथ देतील अशी अपेक्षा होती, ती पूर्णतः फोल ठरली आहे.
Parinay Fuke : लोकशाहीच्या रंगमंचावर एक आरती; मुख्यमंत्र्याची तुलना थेट पंचदेवतेशी
गोंदिया-भंडारा मतदारसंघातील ही स्थिती काँग्रेससाठी डोकेदुखी बनू शकते. कारण, दूध संघ निवडणुकीतील त्यांची आघाडी अपयशी ठरली आणि सहकारी बँकेच्या लढतीत त्यांच्या गोटात अनपेक्षित पळ काढ झाला आहे. भोंडेकरांचं हे पुनरागमन म्हणजे राजकारणातली एक शहाणी चाल की नाईलाजाचा परिपाक, हे येणाऱ्या निवडणूक निकालावर अवलंबून असेल. मात्र, महायुतीत त्यांचे पुनर्प्रवेशाने सध्या तरी सहकार क्षेत्रात गोट अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे.