
सतत प्रकाश झोतात राहणाऱ्या राणा दाम्पत्यानं मकर संक्रांतीचा उत्सव अमरावती शहरात साजरा केला.
अमरावती शहराच्या जवळच असलेल्या हनुमान गढी येथे नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मकरसंक्रांती उत्सव साजरा केला. राणा यांनी अमरावतीच्या हनुमान गढीवर पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. यावेळी भाजपच्या नेत्या व माजी खासदार नवनीत राणा यांनी पतंगबाजीचा आनंद लुटला. नवनीत राणांनी भाजपचं चिन्ह असलेली पतंग उडविली. आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचं चिन्ह असलेली पतंग उडविली. राणा दाम्पत्याकडून यावेळी पतंग महोत्सव साजरा करण्यात आला. राणा दांपत्याकडून दरवर्षी या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते.
यंदा युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपच्या संयुक्त पंतगांनी अमरावतीच्या आकाशात चांगलीच भरारी घेतली. पतंग महोत्सवाला मेळघाटचे भाजप आमदार केवळराम काळे यांनी सुद्धा हजेरी लावली. आमदार काळे यांनी देखील पतंगबाजीचा आनंद लुटला. यावेळी माजी खासदार नवनीत राणा यांनी उखाणा घेत सर्वांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या. ‘शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड. रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड’ असा उखाणा त्यांनी घेतला. माझ्या श्वासापेक्षाही जास्त महत्व रवी राणा यांचं माझ्या जीवनात आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.

Uddhav Thackeray यांना टोला
राणा यांच्याकडून यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करण्यात आली. नवनीत राणा म्हणाल्या की राजकारणात लिमिट क्रॉस करून कोणी कोणावर बोलू नये. संध्याकाळपर्यंत खूप कडू बोलतात त्यांना माझा एकच सल्ला आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. राज्यातील महायुती घट्ट आहे. अतुट आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत अनेकांच्या पतंग कापल्या. मजबूत उमेदवार दिलेत. भाजपचे उमेदवार विजयी झालेत. पतंगीप्रमाणे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्य विकासाची उचं झेप घेईल. आधीही राज्यानं विकासाची भरारी घेतली आहे, असं रवी राणा म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यातून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्यांना आवडायला लागलं आहे, असं दिसतं. उद्धव ठाकरे तिळगुळ खातील आणि महायुती सोबत गोड गोड बोलतील, असं वाटतं. पतंगांप्रमाणेच विकासात महाराष्ट्रात देखील आता भरारी घेणार आहे. ज्या पद्धतीने रवीभाऊ आणि देवा भाऊ गोड बोलतात तसेच गोड बोलावे, असा सल्ला नवनीत राणा यांनी दिला. महायुतीमध्ये कुठलीही स्पर्धा नाही. एकमेकांना साथ देण्यासाठी महायुती आहे. अमरावती जिल्ह्यात विरोधकांच्या पतंग कापून महायुतीचा झेंडा रोवला, असंही राणा म्हणाल्या.